जिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन ! - Pantnagari Times

Breaking News

Monday, December 20, 2021

जिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन !


 


मंगळवेढा / प्रतिनिधी


राष्ट्रीय आदर्श  शिक्षक पुरस्कार प्राप्त  उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या  या कारवाईच्या निषेधार्थ दि. २३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन  शिक्षक समिती महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा ज्योती कलुबर्मे यांनी केले आहे  .

          महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेने एक वेगळा इतिहास निर्माण केला असून  आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून लौकिकपात्र ठरली आहे.      शिवाय महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रेरणास्थान झाली असून एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली असून या शाळेतील अनेक उपक्रम अनुकरणीय ठरले आहेत .

                मात्र स्थानिक राजकीय विवादातून अशा होतकरु शिक्षकांवर अत्यंत  हास्यास्पद आरोप करुन कामात अनियमितता असा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.

                 ' तुम्ही जर नाविण्यपूर्ण, वेगळे काम कराल, तुमचा दत्तात्रय वारे होईल ' अशी म्हण आज शिक्षण व्यवस्थेत रुढ होवू लागली आहे .दत्तात्रय वारे हे आज राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलतेचा चेहरा बनले आहेत. त्यांनाच निलंबित करुन अपमानित केल्यामुळे शिक्षकांत निराशेचे वातावरण पसरले आहे.

           सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मनांमध्ये देखील या संदर्भात मोठी अस्वस्थता दिसून येत आहे . या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी व या संपूर्ण प्रकाराची योग्य ती चौकशी होवून न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवार दि. 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बांधवांनी दिवसभर काळ्या फिती लावून शैक्षणिक कार्य करावे असे आवाहन शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या अंबिका शिंदे , दिपाली बोराळे, सारिका गोडसे, जया साठे, अंजना सुरवसे, पंचफुला गायकवाड , जैतुन्निसा शेख, करुणा खामितकर,दिपाली धत्तुरगी, सुनिता खंकाळ, अलका चिकणे, सुरेखा इंगळे, वैशाली महाजन, राजश्री पाटील, नयना पाटील , शारदा जवळगे, चंद्रकला खंदारे ,कल्पना शेलार, रेखा करांडे ,अनिता काटकर, उमा कोळी यांच्यासह शिक्षक समितीच्या तालुका शाखांच्या प्रमुख सारिका नाळे, सुजाता देशमुख , देवकी दुधाणे ,सुषमा सुतार , यास्मिन शेख, जयश्री धावणे, लक्ष्मी गोरे , अर्चना राऊत , शिवकांता चिमदे यांनी केले आहे .

Pages