युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी मजुरांना फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे वाटप - Pantnagari Times

Breaking News

Thursday, November 4, 2021

युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी मजुरांना फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे वाटप


 


मंगळवेढा / प्रतिनिधी


युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी ता. मंगळवेढा या कारखान्याने नुकतीच आपल्या ऊस उत्पादक यांना १५० रु.ची दिवाळी भेट जाहीर करून गळीत हंगाम २०२०-२०२१ करिता एकुण २२००/- रु.प्रमाणे दर दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून, कामगारांना ही भरघोस दिवाळी बोनस ही दिला आहे.तसेच कारखान्याच्या सभासदांना २५/-रुपये प्रमाणे १० कि.साखर तसेच ज्या ठेवीदारांनी कारखान्याकडे १०,०००/- रुपये ठेव ठेवलेली आहे.अशा सभासदांना सुद्धा २५/-रु प्रमाणे १० किलो साखर घरपोच देण्यात आली आहे.फक्त ऊस उत्पादक व कामगार यांचीच दिवाळी गोड न करता,कारखाना प्रशासनाने ऊस तोडणी मजूर यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना ऊसाच्या फडात जाऊन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांच्या शुभहस्ते दिवाळी साहित्याचे वाटप केले व शुभेच्छा दिल्या. 

युटोपियन च्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.साखर कारखानदारीमध्ये सर्वात महत्वाची व पहिली पायरी म्हणजे ऊस तोडणी करणारे कामगार असतात.हे कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऐन दिवाळीच्या सणामध्ये आपल्या घरांपासून-नातलगांपासून शेकडो किलोमीटर दूर येऊन कडाक्याच्या थंडीमध्ये ऊस तोडणीचे काम करीत असतात.अशा ऊसतोड कामगारांना दिवाळी साजरी करणे अवघड होते.त्यामुळे त्यांना ही दिवाळी साजरा करीता यावी या उद्देशाने कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे कीट वाटप करण्यात आले.असा उपक्रम राबविणारा युटोपियन शुगर्स हा परिसरातील कारखान्यामध्ये एकमेव असल्याने कारखान्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

फोटो ओळी:-

ऊसतोड कामगारांना दिवाळी साहित्याचे वाटप करताना कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक ,मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे व ऊस तोडणी कामगार वर्ग दिसत आहे

Pages