वैराग / मुजम्मिल कौठाळकर
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी काढलेल्या आदेशाविरुद्ध बार्शी तालुका डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेच्यावतीने तहसीलदार शेळके यांना निषेधाचे पत्र देण्यात आले. सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाबाबत बोलताना, हे अनाधिकृत असल्याचं पृथ्वीराज यांनी म्हटलं होतं. मात्र, राज्यघटनेच्या कमल 19-1 अ नुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकार वापरुन ही माध्यमे कार्यरत असल्याचं संघटनेनं तहसीलदार शेळके यांना सांगितले.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी डिजिटल मीडिया विषयी काढलेल्या आदेशाचा महाराष्ट्र राज्य संपादक-पत्रकार संघटनेच्यावतीने तीव्र निषेध राज्यभर करण्यात येत आहे. केंद्र अथवा राज्य सरकारने डिजिटल मिडिया/डिजिटल पत्रकारितेच्या रजिस्ट्रेशनसाठी आर.एन.आय.किंवा पीआयबी सारख्या कुठल्याही यंत्रणेची निर्मिती/उभारणी केलेली नाही. नोंदणी क्रमांकाचा तर विषयच नाही. तरीही, आपण डिजिटल मिडियाला अनधिकृत संबोधून पत्रकारितेची मुस्कटदाबी आपण करत असल्याचं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी म्हटले आहे.
बार्शी तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच, तालुकाध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार शेळके यांना निषेध पत्रही देण्यात आले. यावेळी, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, जिल्हा सचिव विनोद ननवरे, संघटनेचे सल्लागार मयूर गलांडे, उपाध्यक्ष इर्शाद बागवान, सहसचिव धीरज शेळके, आप्पासाहेब पवार, नितीन भोसले, भैरवनाथ चौधरी, विक्रांत पवार, साबीर शेख, आझम बागवान, अर्जुन गोडगे यांसह डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते.