मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील नागरिक चिकुनगुनिया सदृश्य आजाराने त्रस्त आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 20, 2021

मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील नागरिक चिकुनगुनिया सदृश्य आजाराने त्रस्त आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष


 

नंदेश्वर /प्रतिनिधी

नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील विशेषतः इंदिरानगर मधील नागरिक चिकुनगुनिया सदृश आजाराने त्रस्त आहेत. यामध्ये महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांना ताप, खोकला, सांधे आखडणे, पेशी कमी जास्त होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. कोरोना रोगाच्या विळख्यातून सध्या दिलासा मिळत असताना हे नवे आव्हान नागरिकांकडे उभे राहिले आहे. गेले महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे. पण आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकाराकडे किंचितही लक्ष दिले नसल्याने नंदेश्वर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चिकनगुनिया आजाराचे संदिग्ध रुग्ण सर्वाधिक इंदिरानगरमध्ये आहेत. विशेष म्हणजे नंदेश्वर गावात असणारे आरोग्य उपकेंद्र हे इंदिरानगर मध्येच आहे. पण याकडे आरोग्य विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी कसलेही लक्ष दिले नाही. शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावाचा डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. अशी परिस्थिती असताना ग्रामपंचायत प्रशासनाने गावात फवारणी करून घेणे अपेक्षित होते. शिवाय गावात फवारणी करून घ्यावी असे मागणी गावातील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली असताना देखील ग्रामपंचायतने याकडे रीतसर दुर्लक्ष केले आहे. यामुळे सध्या गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे गावात लवकरात लवकर फवारणी करून घ्यावी व तसेच आरोग्य विभागाने लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी सध्या नंदेश्वरकर ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे.

---------

"नंदेश्वर येथील इंदिरानगर येथील सार्वजनिक शौचालयाची मलविसर्जनाचा खड्डा फुटल्यामुळे या भागात दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. चिकुन गुनिया सदृश्य आजाराची साथ पसरण्यात या गोष्टीचा मोठा वाटा असल्याचे इंदिरानगर मधील अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. या सार्वजनिक शौचालयाच्या मलविसर्जन टाकीची दुरुस्ती करण्याची मागणीही ग्रामस्थ करीत आहेत."

Pages