वैराग / मुजम्मिल कौठाळकर
शासनाने ६५ मिलिमीटरचा नियम दाखवत बार्शी तालुक्यातील १० पैकी ६ मंडलांचा पंचनामा सुरू केला आहे. त्यामुळे उर्वरित चार मंडळातील नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले असून पंचनामा व्हावा यासाठी आक्रमक झाले आहेत. प्रत्यक्षात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सर्वपक्षीय नेतेही एकवटले असून आपापल्या स्तरावर शासनाकडून पंचनामा व्हावा यासाठी मागणी करू लागले आहेत.....
बार्शी तालुक्यात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा दीडपट अधिक पाऊस पडून देखील १३७ गावांपैकी ४६ गावांना पंचनाम्यातून वगळण्यात आल्याने या वैराग, सुर्डी, नारी, खांडवी या चार मंडलातील शेतकरी संतप्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून बार्शी तालुक्यात पाऊस पडत असून धरणे, पाझरतलाव ,विहिरी, गाव तळे सर्व भरले असून वाहत आहेत. जून महिन्यात सोयाबीन, उडीद, तूर व कांद्यांची लागवड व पेरण्या वेळेत झाल्या. मात्र सष्टेबर व ऑक्टोबर मधील सातत्यपूर्ण पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उभ्या पिकात गुडघाभर पाणी साचल्यामुळे काढणी तर सोडाच पण झालेला खर्च तरी निघतोय का नाही याची चिंता शेतकर्यांना लागून राहिली आहे .
तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबिन पिकाखाली असून अद्याप पन्नास टक्के ही काढणी झालेली नाही.पावसाची उघडीप नसल्याने सोयाबीनच्या शेंगा झाडाला शेतातच उगवल्या व उडीदाने बुरशी धरली आहे. सततच्या ओलाव्यामुळे तुरीच्या मुळ्या थांबल्या-मोड जागेवरच पिवळे पडू लागले. तर कांद्याची रोपे पिवळी पडून जळून गेली आहेत. कापणीविना सोयाबीन पाण्यात सडू लागले आहे. त्यामुळे सर्व गावांतून पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
चौकट :
[६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या गावांमध्येही पंचनामे करण्याची परवाणगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली असून त्यांच्या आदेशा नंतरच पुढील उपाय योजना करण्यात येईल असे नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांनी सांगितले... ]
[तालुक्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून उद्या यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे. वेळ पडल्यास वगळलेल्या गावांसाठी लढा ही उभारू !
राजेंद्र राऊत .... आमदार ]
[वगळलेल्या गावांमध्ये सतत ४० मिलिमीटर च्या पुढे आणि ६५ मिलिमीटर च्या आत पाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात पाणी साठून प्रचंड नुकसान झाले असुन यासाठी खास बाब म्हणून विचार होणे गरजेचे आहे. याकरिता मंत्रालयात माझा पाठपुरावा राहील .....
दिलीप सोपल.. माजी मंत्री... ]
[नियमाला धरून बसण्यापेक्षा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे यासंदर्भात मी महसूल सचिवांची बोललो असून याचा पाठपुरावा करणार आहे..... राजेंद्र मिरगणे.... माजी सहअध्यक्ष... महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ ]
[वगळलेल्या सर्व गावांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर माझे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही माझी भूमिका राहील .......
निरंजन भूमकर.... निमंत्रित सदस्य.. जिल्हा नियोजन समिती]