येड्राव शिवारात पोलिसांचा हातभट्टी व्यवसायावर छापा दारू व्यवसायिकांचे मन परिवर्तन करून पानटपरी व्यवसायाकडे वळविले. - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, October 5, 2021

येड्राव शिवारात पोलिसांचा हातभट्टी व्यवसायावर छापा दारू व्यवसायिकांचे मन परिवर्तन करून पानटपरी व्यवसायाकडे वळविले.


 

 मंगळवेढा / शिवाजी पुजारी

-------------------------------------

         येड्राव शिवारात हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती प्रभारी पोलिस अधिकारी बापूसाो पिंगळे  यांना मिळताच सदर ठिकाणी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून 30 लीटर दारू जप्त करून हातभट्टी उध्वस्त करण्यात आली.दरम्यान,हातभट्टी चालक याचा मुलगा बिरू चव्हाण याचे पोलिसांनी मन परिवर्तन करून गावात पानटपरी टाकून उत्पन्नाचे साधन निर्माण करून दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्हयाच्या पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी जिल्हाभर  ऑपरेशन परिवर्तन ही मोहिम दारू व्यवसायात चालू केली असून पिडयानपिडया दारू व्यवसाय करण्यात गुंतलेल्या लोकांचे मनपरिवर्तन करून समाजाला घातक असणार्‍या दारू व्यवसायापासून चार हात दूर राहण्याचा सल्ला देत अन्य व्यवसायाकडे मन वळविले जात असल्यामुळे  या कार्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.मंगळवेढा तालुक्यातील येड्राव शिवारात दि. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वा. सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे,पोलिस हवालदार अविनाश पाटील,पोलिस नाईक दत्तात्रय येलपले,पोलिस शिपाई मळसिध्द कोळी,सचिन बनकर आदीनी सदर ठिकाणी छापा टाकला असता  30 लिटर 900 रू.किमतीची  उत्पादन केलेली दारू असल्याचे दिसून आले.हा व्यवसाय शेतामधील असलेल्या घरात गावापासून काही  अंतरावर चालत होता. हा व्यवसाय हरी नारायण चव्हाण (वय 45) हे करीत होते. सदर छाप्याप्रसंगी त्यांचा मुलगा बिरू चव्हाण हा उपस्थित असल्याने पोलिस अधिकारी पिंगळे यांनी दारूपासून समाजावर होणारे परिणाम तसेच उध्वस्त होणारी कुटुंबे याबाबत सविस्तर माहिती देवून त्याचे मन परिवर्तन करून स.पो.नि.पिंगळे यांनी स्वतः आर्थिक सहाय्य करून पानटपरी टाकून गावात व्यवसाय सुरु करून दिला.

मानेवाडी येथील दारू व्यवसायिक अंकुश शंकर मेटकरी याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे यांनी मनपरिवर्तन करून शेळीपालन व्यवसाय सुरु करण्यास मदत केली. हे गाव पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दत्तक घेतले आहे.

मारापूर येथील गोरख भिकाजी यादव या दारू व्यवसायिकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे  व पोलिस उपनिरिक्षक विजय वाघमारे यांनी मनपरिवर्तन करून मळणी मशिन देवून अन्य व्यवसायाकडे वळविण्यात आले. दरम्यान ही कारवाई पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी केली. "मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात हातभट्टी सुरु असल्यास अथवा दारू विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दयावी.त्याच्या नावाची गोपनीयता राखली जाईल.संबंधित व्यवसायिकांचे मन परिवर्तन करून पोलिस प्रशासनाकडून अन्य व्यवसाय सुरु करण्यास मदत केली जाईल".

-बापूसाो पिंगळे

प्र.पोलिस अधिकारी,मंगळवेढा

Pages