वैराग/ मुजम्मिल कौठाळकर
ट्रक चालकास पहाटे झोप लागल्याने वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर क्लिनर सावधगिरीमुळे बचावला आहे. अपघात रविवारी पहाटे वैराग शहराबाहेरील उस्मानाबाद चौकात झाला असुन चालकाविरोधात वैराग पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
जालना येथून सुमारे २५टन स्टिल घेऊन सोलापूरकडे (एम एच बारा एफ सी 8413 ) बारा टायरचा ट्रक निघाला होता. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वैराग - सोलापूर रोडवर उस्मानाबाद चौकाजवळ टूक आला असता चालकाला झोप अनावर झाली त्यात समोरून येणाऱ्या टेम्पोमुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यावरून खाली जाऊन पलटला. यावेळी चालक व मालक असलेले पीरसाहब कोंडीलाल नदाफ ( वय. ४७ रा.बोरामणी. ता. दक्षिण सोलापूर) यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते अयशस्वी ठरले व ट्रकच्या केबिनखाली सापडून जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, आई, पत्नी आणि भाऊ असून कुंटूबांचा मुख्य आधार गेला आहे. यामध्ये ट्रकचे पंधरा हजारांचे नुकसान झाले आहे.
या बाबतची फिर्याद क्लिनर ऋतुराज उत्रेश्वर भालेराव ( वय.२० रा. तळे हिप्परगा.
ता.उत्तर सोलापूर ) यांनी वैराग पोलीसांत दिली असून हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी मयत चालक
पीरसाहब नदाफ विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस कॉंन्स्टेबल सदाशिव गवळी करीत आहेत.