नंदेश्वर /प्रतिनिधी
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे इंदिरानगर व परिसरात चिकुनगुनिया या रोगाची साथ जोरात सुरु असून या रोगामुळे येथील नागरित त्रस्त असून ग्रामपंचायत व आरोग्यविभागाला कळवूनसुध्दा ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे येथील अवस्था नंदेश्वरमध्ये चिकुनगुनिया रोगाची साथ जोमात तर आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन कोमात गेले असल्याची झाली आहे. यावर ताबडतोब औषध फवारणी व इतर उपाययोजना कराव्यात अन्यथा संबंधीत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनिल कसबे यांनी दिला आहे.
नंदेश्वर येथे आरोग्य उपकेंद्र असून समोरच सार्वजनिक शौचालय आहे. शौचालयाची दुर्दशा झाली असून मलविसर्जनाचा खड्डा टाकी फुटल्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. तसेच इंदिरानगर व परिसरात गेले महिनाभरापासून 30 ते 40 नागरीक चिकुनगुनिया या रोगाने त्रस्त असून ताप, खोकला, सांधे आखडणे, पेशी कमी-जास्त होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. संबंधित विभागाला कळवूनसुध्दा आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन येथील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे.
सध्या नंदेश्वर गावातील इंदिरानगर व आंबेडकरनगर, साठेनगर येथे पावसाचे पाणी व सांडपाण्याची कोणतीच उपाययोजना केली नाही. गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचून राहते, पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. औषध फवारणीची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली असताना ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत असून येथील अवस्था नंदेश्वरमध्ये चिकुनगुनिया रोगाची साथ जोमात तर आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन कोमात असल्याची चर्चा होत आहे. यावर लक्ष घालून ताबडतोब औषध फवारणी व इतर उपाययोजना कराव्यात अन्यथा संबंधीत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनिल कसबे यांनी दिला आहे.