मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे वाळू वाहतूक करणार्‍या टेंपो चालकाने पोलिसाच्या अंगावर वाहन घालून जीवे मारले.... - Pantnagari Times

Breaking News

Saturday, September 25, 2021

मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे वाळू वाहतूक करणार्‍या टेंपो चालकाने पोलिसाच्या अंगावर वाहन घालून जीवे मारले....


 

मंगळवेढा/प्रतिनिधी 




               अवैध वाळू वाहतूक करणार्‍या टॅम्पो चालकाने पोलीस कारवाई करतील या भितीपोटी कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई यांच्या अंगावर वाहन घालून जीवेठार मारून खून केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अल्पवयीन मुलासह तीघांना पोलिसांनी  चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.     पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते,अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव आदींनी घटनास्थळी भेट दिली.


                    पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत पोलीस शिपाई गणेश प्रभु सोलनकर हे मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस होते. ते दिनांक 25 रोजी सकाळी 9.40 वाजता शिरसी ते गोणेवाडी मार्गावरून लोक अदालतचे समन्स बजावण्यासाठी जात असताना शिरसी गावच्या शिवारातील हॅटसन डेअरीच्या जवळ आले असता तेथून अवैधरित्या वाळू भरून बिगर नंबरचा पांढर्‍या रंगाचा इन्ट्रा व्ही 30 टाटा कंपनीचा टॅम्पो जात होता. सदर मयत पोलीस  कर्मचारी आपल्यावर कायदेशीर कारवाई करतील या भिती पोटी ती होऊ नये म्हणून मयत सोलनकर यांच्या मोटारसायकलला जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारून खून केल्याची फिर्याद गोणेवाडी गावचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास मंगळवेढ्याच्या डी.वाय.एस.पी राजश्री पाटील या करीत आहेत.


              या घटनेत तीघे आरोपी असून हे तपकीर शेटफळ येथील असल्याची माहिती समोर येत असून त्यामध्ये एक अल्पवयीन असल्याचे समजते.हे वाहन माण नदीपात्रातून वाळू घेऊन जात होते.तालुक्यातील भिमा व माण नदीपात्रातून मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पोलिस प्रशासन व महसूल खाते यांनी कारवाईसाठी संयुक्त पथकेही नेमली होती.घटनेच्या अगोदर 24 तास बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर पोलिसांनी कारवाईही केली होती. 

         दि.1 सप्टेंबरपासून महसूल विभागाने सलग सोमवार ते रविवार या दरम्यान मंडल अधिकारी व तलाठी यांचीही पथके रात्रपाळीत कारवाईसाठी नेमली आहेत.वाळू व्यवसायात मुबलक पैसा मिळत असल्यामुळे वाळू तस्करवाले या व्यवसायासाठी फोफावले आहेत. मुजोर वाळू तस्करांनी चक्क खाकी वर्दीला न जुमानता चक्क अंगावर वाळूचे वाहन घालून जीवे ठार मारल्याचा प्रकार घडल्याने या घटनेमुळे संपूर्ण जिल्हयातील पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.दरम्यान मंगळवेढयाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे असल्याच्या भावना या घटनेनंतर नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.मयत  सोलनकर यांच्या  पश्‍चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.त्यांचे मूळ गाव बिलेवाडी ता. सांगोला हे आहे.




             सोलनकर यांचा अंत्यविधी शासकीय इतमात करण्यात आला,सायंकाळी 5.15 वाजता शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक  हिम्मतराव जाधव,डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व पोलीस कर्मचारी अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

   

         ही दुर्देवी घटना असून सोलनकर कुटंबियांच्या दुखाःत संपूर्ण पोलीस दल सहभागी असल्याची भावना पोलीस अधिक्षक सातपुते यांनी व्यक्त केली.

Pages