शिक्षक समिती नेहमीच शिक्षकांना प्रेरणा देते - डाॅ.सचिन लादे - Pantnagari Times

Breaking News

Saturday, September 25, 2021

शिक्षक समिती नेहमीच शिक्षकांना प्रेरणा देते - डाॅ.सचिन लादे


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीद घेऊन शिक्षक हितासाठी चळवळ म्हणून काम करीत असलेल्या  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अविरत धडपड करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम अखंडपणे सुरु ठेवले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील चांगुलपणाला पाठबळ व ऊर्जा देण्याचा उपक्रम गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डाॕ. सचिन लादे यांनी व्यक्त केले .

         शिक्षक समिती मंगळवेढा शाखेच्या वतीने शिक्षकांच्या  गौरव समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते . मंगळवेढा तालुक्यातील मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेल्या १५ तर बी.एड. पदवी संपादन केलेल्या १० शिक्षक बांधवाच्या सत्कार समारंभात ते बोलत होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य नितिन नकाते हे होते .याप्रसंगी बोलताना डाॕ.लादे यांनी शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो या भूमिकेतून शिक्षक बांधवांनी शैक्षणिक अर्हता वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद असून त्यांची प्रेरणा इतरांनी घ्यावी असे आवाहन करतानाच बढतीचा योग वाट्याला आलेल्या नवनियुक्त मुख्याध्यापकांनी सहकारी शिक्षकांना विश्वासात घेऊन उत्कृष्ठ शैक्षणिक कार्य करावे व तालुक्याच्या शैक्षणिक विकासाला चालना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली .

         याप्रसंगी शिक्षण विभागाचे सुशोभिकरण करुन शाळांपुढे आदर्श ठेवणारे गटशिक्षणाधिकारी पी.के.लवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याशिवाय विस्ताराधिकारी डाॕ.बिभिषण रणदिवे , केंद्रप्रमुख ईश्वर भोसले व विष्णू धोत्रे यांनी आपापल्या पदाचा पदभार घेतल्याने त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी मि.सभापती सुधाकर मासाळ , दामाजी शुगरचे संचालक सचिन शिवशरण , शिक्षक समितीचे नेते राजेंद्र नवले , अमोघसिद्ध कोळी ,सुनिल कोरे यांनी यावेळी गौरवमूर्तींना शुभेच्छा दिल्या . तर देऊबा कांबळे , देविदास चौधरी , दत्तात्रय वाघ यांनी गौरवमूर्तींच्या वतीने सत्काराला उत्तर दिले.

        यावेळी शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार यांनी प्रास्तविक केले तर सूत्रसंचलन अमित भोरकडे यांनी केले .शेवटी सर्वांचे आभार विठ्ठल ताटे यांनी मानले .यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते .

Pages