किरीट सोमय्या यांच्या निरर्थक आरोपांनी जनतेची करमणूक - संजय पवार - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, September 21, 2021

किरीट सोमय्या यांच्या निरर्थक आरोपांनी जनतेची करमणूक - संजय पवार


 

मंगळवेढा / प्रतिनिधी

वर्षानुवर्षे जनतेसाठी अविरत काम करुन संघर्षाच्या मुशीतून आकारास आलेल्या विरोधी पक्षातील बहुजन समाजाचे नेतृत्व बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपाने रचले असून किरीट सोमय्या यांचे  राजकीय आरोप हे त्याच कारस्थानाचा भाग असून त्यांच्या हास्यास्पद आरोपांनी जनतेची करमणूक सुरु असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी संजय पवार यांनी केला .

          भाजपाच्या राजकीय आरोप व्यवहार समितीचे प्रमुख किरीट सोमय्या यांनी  ना.हसन मुश्रीफ यांचेवर केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने    पवार म्हणाले ना.हसन मुश्रीफ यांनी कागल मतदारसंघातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा दूवा घेत मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यात मोठे रचनात्मक कार्य उभारले आहे. महाविद्यालयीन जीवनात आपण स्वतः पाच वर्षे कोल्हापूर मध्ये वास्तव्याला असताना त्यांची कार्यपद्धती जवळून अनुभवली असून मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील या नेत्यांवर जनतेचे असलेले प्रेम थक्क करणारे आहे .

     यावेळी भाजपा व सोमय्या यांच्यावर हल्ला चढवताना पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार आस्थिर करण्यासाठी अवलंबलेली सर्व कुटील कारस्थाने निष्प्रभ ठरल्याने राजकीय  वैफल्यातून अशा आरोपांची मालिका सुरु असून त्याकडे केवळ करमणूक म्हणून जनता बघत असल्याचा टोला त्यांनी लगावला. वास्तविक एखादी संस्था ,कंपनी ,कारखाना अथवा मालमत्तेविषयी कुठे संशयास्पद व्यवहार झाले असतील तर त्याबाबत तक्रार करण्याचा अथवा चौकशीची मागणी करण्याचा सोमय्या यांना अधिकार आहे . मात्र अशा ठिकाणाला भेटी देण्याचा कांगावा करुन मिडीयाचे लक्ष  वेधण्यासाठी असा खटाटोप ते करीत आहेत .कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा ठिकाणाला भेटी देऊ नयेत अशी विनंती प्रशासनाकडून झाल्यानंतर देखील त्यांच्या कडून मिडीयाचा फोकस स्वतःकडे वळवून राजकीय वातावरण  गढूळ करण्याच्या उद्देशाने हा प्रकार  सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला .

       स्वतःच्या लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या नाराजीमुळे 2019मध्ये सोमय्या यांना भाजपाने  उमेदवारी नाकारली होती . मात्र सध्या ते पंतप्रधान मोदी , गृहमंत्री शहा व फडणविस यांची मर्जी संपादन करुन स्वतःचे राजकीय  पुनर्वसन व्हावे म्हणून खटाटोप करीत आहेत .स्वतःच्या राजकीय आस्तित्वासाठी वर्षानुवर्षे जनतेची निरपेक्ष सेवा करणाऱ्या लोकाभिमुख नेत्यांना बदनाम करण्याचा खटाटोप त्यांनी बंद करावा अन्यथा भाजपाची उरलीसुरली विश्वासार्हता मातीमोल करण्याचे पुण्य सोमय्या यांच्या वाट्याला येईल असा टोलाही त्यांनी  लगावला.

Pages