मरवडे येथील गैबीसाहेब दर्ग्याला मिळणार तीर्थक्षेत्राचा " ब "दर्जा आ. आवताडे यांनी केली शिफारस - Pantnagari Times

Breaking News

Friday, July 16, 2021

मरवडे येथील गैबीसाहेब दर्ग्याला मिळणार तीर्थक्षेत्राचा " ब "दर्जा आ. आवताडे यांनी केली शिफारस


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


मरवडे तालुका मंगळवेढा  हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या व सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक प्रांतातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरवडे येथील पीर मर्दान गैबीसाहेब दर्ग्याचा तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यातून ब दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर करण्याची शिफारस आ. समाधान आवताडे यांनी केल्याने भाविकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

      मरवडे येथील गैबीसाहेब दर्गा हा हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून मोहरम, ऊरुसाच्या काळात येथे मोठी यात्रा भरत असून प्रत्येक गुरुवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात या उद्देशाने मागील आठ वर्षापूर्वी या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला असून त्या माध्यमातून काही विकास  कामे मार्गी लावण्यात आली आहेत.

         बाहेर गावातील भाविकांची वाढती वर्दळ विचारात घेता या ठिकाणी आणखी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही बाब मरवडे गावातील भाविक तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर ,अल्लाबक्ष इनामदार यांच्यासह गावातील कार्यकर्त्यांनी आ.आवताडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

         मरवडेकरांच्या या मागणीची तत्काळ दखल घेऊन आ.आवताडे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे शिफारस पत्र पाठवून मरवडे येथील दर्याला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळावा यासाठी सचिव, ग्रामविकास मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

        तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ब दर्जा प्राप्त झाल्यानंतर सुमारे दोन कोटींची विकास कामे मंजूर होणार आहेत. यामध्ये सांस्कृतिक सभागृह, भक्त निवास, प्रसाधनगृह सुविधा, सुशोभिकरण, संरक्षक कुंपन भिंत अशी अनेक कामे मार्गी लागणार आहेत.

         तीर्थक्षेत्र विकसित व्हावे यासाठी दर्ग्याच्या लगत असणारी वीर शिवा काशीद चौकातील जागा संरक्षित करण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी मुस्लिम समाजाने केली असून मागील तीन वर्षापूर्वी या परिसरातील दगडाचे ढीग, उकीरडे काढून जागा खुली करुन अतिक्रमणास पायबंद घातला होता. मात्र सध्या या परिसरात अतिक्रमण करण्याची स्पर्धा लागली असून ग्रामपंचायत कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pages