मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी ताजुद्दीन मुलाणी (हुन्नूर ) व देऊबा कांबळे ( रड्डे ) यांची नुकतीच निवड करण्यात आली. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित दोन्ही शिक्षकांना या पदांसाठी संधी मिळाल्याने तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवातून या निवडीचे स्वागत केले जात आहे.
तालुका परिवारातील जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयास अधिन राहून अवधूत क्षीरसागर व युवराज कदम यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. या पदांसाठी मुलाणी, कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे दोन्ही शिक्षक कार्यकर्ते तालुका परिवाराचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.
ताजुद्दीन मुलाणी यांचा शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून लौकिक असून भोसे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत घडविले आहे. शिवाय हुन्नूर येथे नवचैतन्य वाचनालयाची उभारणी करुन हुन्नूर परिसरात वाचनसंस्कृती वाढीस लावलेली आहे. तर देऊबा कांबळे यांनी देखील चांभारवाडी, चिक्कलगी येथे पदवीधर शिक्षक म्हणून उठावदार कार्य केले असून रड्डे गावातील सामाजिक चळवळीत झोकून देऊन काम करतात. या दोहोंनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
दि. 23 रोजी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्या निमित्ताने दोहोंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या चेअरमन सौ.वंदना बिले, व्हा.चेअरमन कौशल्या दवले, चंद्रकांत बुगडे, रामचंद्र पाटील, पंडीत कोरे, सुरेश पवार ,श्रीमंत पाटील, शामराव सरगर ,विठ्ठलराव ताटे, सिद्धेश्वर सावत ,हरिभाऊ निकम, जितेंद्र कांबळे , विवेक स्वामी , शशिकांत साठे, तायाप्पा टोणे, बाळासाहेब कांबळे इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक संचालक सिद्धेश्वर धसाडे यांनी केले तर सूत्रसंचालन गिरीश जाधव यांनी केले. याप्रसंगी रावसाहेब सुर्यवंशी, दिगंबर तोडकरी,चंद्रकांत पवार, विश्वनाथ वाघमारे,दत्तात्रय येडवे,राजेंद्र कांबळे यांनी दोन्ही नूतन संचालकांचे अभिनंदन केले. शेवटी आभार संचालक दिलीप गडदे यांनी मानले.