आवताडे यांच्या नतमस्तकाने विधानसभेच्या पहील्या पायरीचेही झाले "समाधान" - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, May 12, 2021

आवताडे यांच्या नतमस्तकाने विधानसभेच्या पहील्या पायरीचेही झाले "समाधान"


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


संपुर्ण महाराष्ट्रात साधू‌-संताचा व संत महात्म्यांचा मतदारसंघ म्हणून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाकडे संपुर्ण राज्याचे कायमच लक्ष असते.याच मतदार संघातून स्व.आ.भारतनाना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगिरथ भालके यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई होऊन भाजपाचे समाधान आवताडे हे 3733 मतांनी निवडून आले.त्यानंतर दि.12 मे रोजी विधानभवन येथे नुतन आमदार समाधान आवताडे यांच्या शपथविधीचा कार्यक्रम विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील जनतेचे विकासात्मक आणि धोरणात्मक अधिष्ठान असलेल्या विधानसभा सदनात प्रथम प्रवेश करण्यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे नुतन आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेतले व मगच विधानभवनात प्रवेश केला.त्यांच्या या कृतीने संत परंपरेचा व संस्कृतीचा वारसा समृद्ध झाला असल्याचे संपुर्ण महाराष्ट्रात बोलले जात आहे. 

२५२-पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार कै.भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा सदस्य जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा.आ.समाधान आवताडे यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून ३७३३ इतके मताधिक्य घेऊन विजय संपादन केला होता. त्यांच्या या निवडीनंतर बुधवार दिनांक १२ मे २०२१ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या दालनात आ. समाधान आवताडे यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देऊन अधिकृतपणे विधानसभा सदस्य म्हणून जाहीर केले.

         गेल्या दोन पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये आलेले राजकीय अपयश आ. आवताडे यांनी पचणी पाडून गेले अनेक महिने त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क व विविध विकास कामांचा झंझावात निर्माण केला होता.सध्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना यासारखी सहकार समृद्ध संस्था त्यांच्या ताब्यात आहे.त्यामुळे आमदारकीच्या जोडीला मतदार संघातील सहकाराचे जाळे  मजबूत करून दोन्ही तालुक्याच्या अर्थ चक्राची वीण आणखी घट्ट करण्यास खूप मोठा वाव असल्याची भावना निर्माण झाली आहे.


      भारताची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे आणि दातृत्वाचा अगाध महिमा ज्यांच्या संतसेवेत नेहमीच अधोरेखित होतो असे श्री संत दामाजी पंत यांचे स्मरण करून नूतन आमदार आ.समाधान आवताडे यांनी आमदारकी स्वीकारली.तत्पूर्वी आ.समाधान आवताडे यांनी शपथ विधी दालनात प्रवेश करण्यापूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधिमंडळ परिसरामधील पुतळ्यास अभिवादन केले. शपथ ग्रहण केल्यानंतर आ.समाधान आवताडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या सद्य स्थिती अनुसरून महामहिम राज्यपाल यांना पत्र लिहून Vaccine आणि रेमडिसिवर यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली.

       यावेळी विधानसभा सचिव मा.भागवतसो,भा. ज.पा. मुख्य प्रतोद अॅड.आ.आशिषजी शेलार,आ. कॅप्टन तामिळ सेल्वन सायन,माजी मंत्री मा.संजय (बाळा)भेगडे,आ.प्रशांत परिचारक,राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बाळा पाटील,ठाणे विधानसभा सदस्य आ.संजय केळकर,पुणे जिल्हा भा.ज.पा.अध्यक्ष गणेश भेगडे,मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे,भाजपाचे विधिमंडळ सचिव गोपाळ दळवी,भा जपाचे विधिमंडळ कार्यालय प्रमुख राजू खंडीसोड, उद्योगपती संजय आवताडे, सोलापूर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री शशिकांत चव्हाण,अरुण बारबोले आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमास मोजकेच मान्यवर व आधिकारी वर्ग आणि कार्यकर्ते उपस्थित होते.परंतु या सर्व राजकीय घडामोडीत मंगळवेढ्याच्या आवताडे यांच्या नतमस्तकाने विधानसभेच्या पहील्या पायरीचेही झाले "समाधान" आहे हे मात्र नक्की...!

Pages