मंगळवेढा / प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी मंगळवेढा तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय सुविधेसाठी तीन दिवसात पाच लाख रुपये मदत निधीचे संकलन पुर्णत्वास गेले असून आणखी दोन लाख रुपये निधीचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे.
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या रणधुमाळीत अनेक राजकीय कार्यकर्ते कोरोना बाधित ठरले. तर निवडणूक ड्युटी बजावणारे प्राथमिक शिक्षक देखील कोरोनाच्या तडाख्यात सापडले. या गंभीर परिस्थितीत अखेर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सरसावली आहे. संघटनांच्या समन्वय समितीची बैठक झाली. यामध्ये शिक्षक नेते सुरेश पवार, संजय चेळेकर,श्रीमंत पाटील, सिध्देश्वर धसाडे, चंद्रकांत पवार, विठ्ठल ताटे, सिद्धेश्वर सावंत, संभाजी तानगावडे, भाऊसाहेब माने, धनंजय लेंडवे,संजय बिदरकर, दत्तात्रय येडवे, शाम सरगर, पांडुरंग शिंदे, आप्पाराया न्यामगोंडे, रवींद्र लोकरे, उमेश कांबळे, राजेंद्र कांबळे, जमीर शेख, संभाजी सुळकुंडे, भारत शिंदे, मारुती दवले, भगवान चौगुले, बाळासाहेब जाधव, जितेंद्र कांबळे, सूर्यकांत जाधव, गिरीश जाधव, संतोष पवार, अनिल दत्तू, अमित भोरकडे, संतोष लाड, सुभाष साळसकर, ज्ञानेश्वर घोडके, मंगेश मोरे, ज्योती कलुबर्मे,मंगल बनसोडे,अनिता भिंगे आदींचा यामध्ये सहभाग होता.
तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण व नातेवाईक उपचाराअभावी हतबल झाल्याने तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाआहे. स्वेच्छेने मदत निधी संकलनाचे कार्य सुरु करण्यात आले असून त्यासाठी शिक्षकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्राथमिक शिक्षकांतून निधी संकलनासाठी मोहीम राबविण्यास आरंभ झाल्यानंतर माध्यमिक ..उच्च माध्यमिक शिक्षकांच्या संघटना व संस्था देखील अशाच पद्धतीने योगदान देण्यासाठी एकत्र आलेल्या आहेत . विशेष म्हणजे मे महिन्याच्या मासिक वेतनातून कोविड निधी कपात करण्याचा राज्य शासनाने निर्णय पारित केल्यानंतर देखील शिक्षकांनी आपल्या भागातील कोविड लढ्यासाठी योगदान दिल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.