राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांची उमेदवारी घोषित करून जनतेचा उमेदवार दिला - संजय पवार - Pantnagari Times

Breaking News

Monday, March 29, 2021

राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांची उमेदवारी घोषित करून जनतेचा उमेदवार दिला - संजय पवार


 

मंगळवेढा- प्रतिनिधी

पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भगिरथ भालके यांची जनतेच्या मनातील उमेदवार घोषित करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने आपला शब्द खरा करुन दाखविल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित मरवडे येथील स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे गटनेते संजय पवार यांनी व्यक्त केली .

       स्व. भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ना.अजितदादा पवार , ना. जयंत पाटील यांनी   21मार्च रोजी पंढरपूर येथे हजेरी लावत दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत पक्षाकडून जनतेच्या मनतील उमेदवार जाहीर करण्याचे अभिवचन दिले होते.

          

      स्व.भारतनानांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी व रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी भगिरथ भालके यांनाच उमेदवारी द्यावी अशी सर्वसामान्यांची भावना होती.

       

      मात्र स्व. भारतनाना यांच्या पश्चात मतदारसंघावर पकड मिळविण्याचे मनसुबे ठेवून असलेली विविध गटातटाचे नेतृत्व करणारी नेतेमंडळी राजकीय हस्तकांमार्फत भगिरथ भालके यांच्या उमेदवारीच्या मार्गात अडथळे निर्माण करीत पक्षनेतृत्वापुढे वस्तुस्थितीचा विपर्यास करीत होती.

         शिवाय  पक्षाच्या नावावर स्वतःची दुकानदारी थाटलेल्या आणि विविध मार्गाने स्वार्थ साधणार्या मंडळींना देखील पक्षातील मक्तेदारी सुरु ठेवण्यासाठी स्वयंभू व सक्षम नेतृत्व म्हणून जनसामान्यांचे पाठबळ असलेल्या भगिरथदादांची अडचण होत असल्याने संभ्रम निर्माण केला जात होता . त्यातूनच  भगिरथ यांच्या मातोश्री जयश्री भालके यांचे नाव आघाडीवर असल्याच्या बातम्या देखील पेरल्या जात होत्या.

    मात्र जनतेची व प्रामाणिक , निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावना ओळखून आगामी काळासाठी एक शाश्वत , दमदार नेतृत्व उभे करण्यासाठी भगिरथ भालके यांची  महाविकास आघाडीकडून उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी घोषित केली. या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत असून मरवडे येथील कार्यकर्त्यांनी देखील उत्साहाने स्वागत केले आहे .

       देशाचे नेते खा. शरदचंद्र पवार यांच्या विचारांची पाठराखण करणाऱ्या या मतदारसंघात स्व. भारतनाना भालके यांच्या आठवणी जागत्या ठेवण्यासाठी कार्यकर्ते अपार मेहनत घेऊन भगिरथ भालके यांचा विजय सुकर करतील असा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला व राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला धन्यवाद दिले . यावेळी मरवडे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस व भालकेप्रेमी पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .

Pages