दहा दिवसात दहा हजार फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करणार:-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 9, 2021

दहा दिवसात दहा हजार फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करणार:-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर


 

सोलापूर, दि.9 : दहा दिवसांत दहा हजार फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेरफार नोंदीच्या कामांचा जलदगतीने निपटारा करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याद्वारे विशेष अभियान राबविण्यात येऊन एक फेब्रुवारी पासून दिवसांत सुमारे सहा हजार फेरफार नोंदी निकालात काढण्यात आल्या. दहा फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत दहा हजार नोंदी निर्गत करण्याचे नियोजन असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

त्यांनी दिलेली माहिती अशी, डिजीटल इंडिया भूमी अभिलेखांच्या आधुनिकीकरण कार्यक्रमातून ई-फेरफार प्रणाली राबवण्यात येते. यातून तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत नोंदी निर्गत करण्यात येतात. 31 जानेवारी 2021 रोजी मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर 12671 नोंदी प्रमाणीकरणाकरिता प्रलंबित होत्या. याबाबत एक फेब्रुवारी रोजी आढावा घेण्यात आला. त्यावेळी दहा फेब्रुवारीपर्यंत दहा हजार नोंदीची निर्गतीकरण करण्यात यावे. अशा सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार आठ फेब्रुवारीपर्यंत सुमारे सहा हजार फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात आले आहे. निर्गत केलेल्या नोंदीची संबंधित खातेदारांना माहिती दिली जाणार आहे.

पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते होणार सातबारा वितरण

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उद्या मोडनिंब येथे निर्गत करण्यात येणाऱ्या नोंदीबाबत प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. तसेच श्री. भरणे यांच्या हस्ते सात बारा उताऱ्याचे वितरण केले जाणार आहे. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी यांचा सत्कार केला जाणार आहे. फेरफार निर्गतीकरण अभियानामुळे लोकाभिमुख कामकाज होणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होणार आहेत. नागरिकांनी फेरफार नोंदीसाठी संबंधित तहसीलदार कार्यालयास अर्ज द्यावा, असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.

Pages