बनावट नियुक्ती पत्राद्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 9, 2021

बनावट नियुक्ती पत्राद्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक


 

आरोपींकडे सापडले बनावट शिक्के आणि राजमुद्रा

भिगवन / प्रतीनिधी


सरकारी नोकरी लावतो म्हणून वेळोवेळी रोख रक्कम आणि चेकद्वारे सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून ते तीस लाख रुपये घेऊन बनावट ऑर्डरची नियुक्तीपत्र राजमुद्रा आणि सही शिक्के मारून देऊन फसवणूक करणाऱ्या चौघांना भिगवन पोलिसांनी नुकतीच अटक केली.

शैलेश गंगाधर होडके वय ३३ वर्षे रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांनी याबाबतची फिर्याद भिगवन पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सिद्धार्थ देविदास झेंडे वय ४० सौ. प्रगती सिद्धार्थ झेंडे वय ३५, रा. म्हसोबाची वाडी ता. इंदापूर, जि. पुणे, अमोल विजय मोहिते वय ३०, रा. टणू नरसिंहपूर, ता. इंदापूर, जि. पुणे, दीपक माने देशमुख रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३९/२०२१ भादवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७२, ४७४, ४७५, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील आरोपी यांनी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र रविराज बोराडे यांना सरकारी नोकरी लावतो म्हणून दि. ८ सप्टेंबर २०१८ ते १६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत फिर्यादी कडून २० लाख रुपये व त्याच्या मित्राकडून १३ लाख रुपये घेऊन त्यांना बनावट ऑर्डरची हुबेहूब पत्र तयार करून देऊन त्यावर राजमुद्रा वर सही शिक्का मारून वरील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून वरील चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. न्यायालय इंदापूर यांना सादर केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दडस पाटील करीत आहेत.

वरील आरोपींची कार्यपद्धती पाहता अनेक सुशिक्षित बेरोजगारांना यांनी गंडा घातलेला असू शकतो. यामध्ये फसवणुकीचे फार मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते.

इतर तरुणांची फसवणूक झाली असल्यास फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

Pages