मंगळवेढा / प्रतिनिधी
"पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने (स्व) आमदार भारत भालके यांच्या घराबाहेरच्याला संधी दिली, तर पक्षाला ही जागा गमवावी लागेल,'' असा इशारा कॉंग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला.
(स्व.) भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजन पाटील हे होते. व्यासपीठावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार संजय शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके, उत्तमराव जानकर, प्रकाश पाटील, उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राहुल शहा, लतीफ तांबोळी, महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, संभाजी शिंदे, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, अजित जगताप, विजय खवतोडे, दत्ता मस्के, ऍड नंदकुमार पवार, भारत बेदरे, मारूती वाकडे, रामचंद्र वाकडे, मुजम्मील काझी, संगीता कट्टे, दिलीप जाधव, पी. बी. पाटील, बसवराज पाटील, संदीप बुरकूल, गुलाब थोरबोले, अजित यादव, अशोक माने आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की गोरगरीब जनतेच्या प्रश्नाला वाहून घेणारे नेते आमदार भारत भालके आज आपल्यात नाहीत. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाच्या पाणीप्रश्नासाठी राज्यपालाची वेळ घेवून त्यांच्याशी भांडणारे आमदार भालके होते. परंतु आज पोटनिवडणुकासाठी माध्यमातून अनेक नावे पुढे येत आहेत. त्यांचा वारसदार भगीरथ भालकेच असून पक्षाने वारसदार म्हणून त्याचा विचार करावा. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले की भगीरथ भालके यांनाच पोटनिवडणुकीत पक्षाकडून संधी दिली जाईल. जे तुमच्या मनात आहे, तेच होणार आहे. पवारसाहेबांना सांगून नानांचा वारसदार म्हणून संधी दिली जाईल. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारतनानांचा दरारा केवळ मतदारसंघात नाहीत, तर विधानसभेतही होता. ते बोलायला उभारले की सभागृह शांत व्हायचे. त्यांची उणीव भासत असली तरी बहीण म्हणून मी भगीरथच्या पाठीशी आहे.
चांदापुरी कारखान्याचे अध्यक्ष उत्तमराव जानकर म्हणाले की जनतेसाठी झटणाऱ्या आमदार भालकेंसाठी माझ्या निवडणुकीतील दोन दिवस दिले. भले माझा पराभव झाला; परंतु त्यांनी बलाढ्य शक्तीचा केलेला पराभव मला आनंददायी होता.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके म्हणाले की, ""तत्कालीन सरकारने 35 गावांसाठी पाणी आणि गावे कमी करण्याचा घाट घातला, त्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सरकारच बदलताच या योजनेत दुरूस्ती करत या गावांना न्याय देण्याची भूमिका नानांनी ठेवली. गेली 35 वर्षे समाजाशी जोडलेली नाळ तुटू नये; म्हणून जनसंवाद यात्रेचे आयोजन केले. कोरोनाशी लढताना तब्येत जपा म्हणून सांगितले तर न ऐकता नाना जनतेच्या संपर्कात होते. त्यांच्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आग्रह केल्याने मी तुमच्यासमोर उभा आहे. काहीना वाटते नाना आक्रमक होते. भगीरथ शांत आहे. होय, मी शांत असलो तरो लढण्याच्या बाबतीत नानासारखाच आक्रमक आहे.''
प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी केले. सकल धनगर समाजाच्या वतीने भगिरथ भालके यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर करण्यात आला.