वाहन चाचणी न देताच थेट 'लायसन्स' - Pantnagari Times

Breaking News

Monday, February 15, 2021

वाहन चाचणी न देताच थेट 'लायसन्स'


 


मुंबई : नवीन वाहन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित चालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहन चाचणी न देताच थेट लायसन्स (अनुज्ञप्ती) मिळणार आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच मसुदा अधिसूचना काढली आहे. त्यानुुसार नवीन वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहेत.


सध्या राज्यात शासन मान्यतेनुसार खासगी वाहन प्रशिक्षण केंद्र असून यामध्ये चालकाला २१ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यातून बाहेर पडलेला चालक आरटीओत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करतो. त्यानंतर सर्व कागदपत्रे पूर्ततेनंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेतली जाते आणि त्यानंतर शिकाऊ लायसन्स मिळते. परंतु यातून कुशल चालक मिळतातच असे नाही.

त्यामुळे रस्ते वाहतूक मंत्रालयाने अद्ययावत असे वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची नुकतीच मसुदा अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार हे केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कंपन्या आणि कंत्राटदारांसमोर काही अटी असतील.


अटी कोणत्या?


केंद्राच्या अधिसूचनेनुसार वाहन प्रशिक्षण केंद्र हे मैदानी परिसरात साधारण एक किंवा दोन एकर जागेत हवे. यामध्ये प्रथम वाहतूक नियम शिकवण्याची साधने हवीत.


संगणक, मल्टिमीडिया प्रोजेक्टर, अवजड आणि हलके वाहने आभासी प्रशिक्षण चाचणी यंत्रणा, स्वतंत्र वाहन चाचणी पथ, पार्किंग व्यवस्था इत्यादी सुविधा या केंद्रात असणे गरजेचे आहे. त्याची पूर्तता करणाऱ्या कंपनी आणि कंत्राटदारालाच केंद्राकडून मान्यता मिळेल.


या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या चालकाला आरटीओत पुन्हा चाचणी देण्याची गरज लागणार नाही. त्याला थेट लायसन्स प्राप्त होणार आहे.


नव्याने वाहन प्रशिक्षण केंद्रासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने मसुदा अधिसूचना जारी केली आहे. या विषयी काही बदल हवे असल्यास प्रत्येक राज्याला ३० दिवसांत सूचना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासन याबाबत निर्णय घेणार आहे. - अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

Pages