जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत
सातारा / प्रतिनिधी
सैदापूर, ता.सातारा येथे सुट्टीवर आलेल्या जवानाला गंभीर मारहाण झाल्यानंतर उपचार सुरू असताना पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी, पुणे येथे खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर झिरोने तो गुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यात येताच स्थानिक गुन्हे अन्वेषशण विभागाच्या पथकाने (एलसीबी) छडा लावला. याप्रकरणी मृत जवानाची पत्नी, मेहुणा व भावजयीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयितांना अटक केली. दरम्यान, दारु पिवून त्रास देत असल्याने त्यातून मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
सोमनाथ भरत आंबवले (वय 29, रा.खोलवडी ता.वाई), चेतना संदीप पवार (वय 35, रा.सैदापूर ता.सातारा), सुषमा राहूल पवार (वय 38, रा.यादोगोपाळ पेठ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील चेतना पवार ही संदीप पवार यांची पत्नी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सैन्य दलात असलेले जवान संदीप जयसिंग पवार (रा.सैदापूर) हे सुट्टीनिमित्त गावी सातारला आले होते. दि. 27 रोजी सायंकाळी त्यांना गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी उपचारासाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचाराला दाखल केल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला
पुणे येथे शवविच्छेदन झाल्यानंतर गंभीर मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना मृत्यूनंतर समोर आल्यानंतर खळबळ उडाली. कारण कोणी मारले? का मारले? कशासाठी मारले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. याशिवाय मृत संदीप पवार यांच्या पत्नीनेच याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाची तक्रार दिली. वानवडी, पुणे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती घटना सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तपासासाठी तो वर्ग करण्यात आला.
जवानाचा खून झाल्याने सातार्यात खळबळ उडाली. याप्रकरणी सातारा एलसीबीचे पथक तपास कामाला लागले. पोलिसांनी घटनास्थळी, आजूबाजूचा परिसर, मृत संदीप पवार यांचे शेजारी तसेच कुटुंबीयांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. कुटुंबिय सुसंगत माहिती न देता काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सातारा एलसीबी पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात करताच जवान संदीप पवार हे सुट्टीवर आल्यानंतर कुटुंबीयांना दारू पिवून मारहाण, शिवीगाळ करत त्रास देत होते. यातूनच कुटुंबीयांनी दि. 27 रोजी लाकडी काठीने गंभीर मारहाण केली. ही घटना समोर येऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी सातार्यात त्यांना उपचारासाठी न नेता थेट पुणे येथे हलवले. अखेर सातारा एलसीबीने कौशल्यपूर्ण तपास करत संबंधित तिन्ही संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, पोलिस हवालदार ज्योतीराम बर्गे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मुनीर मुल्ला, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अजित कर्णे, विशाल पवार, नीलेश काटकर, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.