उस पेटवला, चारही बाजूंनी शार्पशूटर लावले, तरीही बिबट्या अधिकाऱ्यांसमोरून पळाला - Pantnagari Times

Breaking News

Monday, December 7, 2020

उस पेटवला, चारही बाजूंनी शार्पशूटर लावले, तरीही बिबट्या अधिकाऱ्यांसमोरून पळाला


 

करमाळा / प्रतिनिधी

करमाळा (जि. सोलापूर) तालुक्‍यात गेल्या सहा दिवसांत तीन बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्याचा अथवा ठार मारण्याचा आदेश वन विभागाने दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (ता. 7 डिसेंबर) बिबट्या लपलेला चिखलठाण येथील पाच एकर उसाचा फड पेटवून देण्यात आला. मात्र, वन अधिकाऱ्यांच्या समोरून या बिबट्याने पलायन केले. 

चिखलठाण (ता. करमाळा) येथे लांडा हिरा भागात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराची मुलगी फुलाबाई हरिचंद कोटले (वय 8) हिचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. 7 डिसेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 

या घटनेची माहीती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी चिखलठाण येथे आज सकाळी दाखल झाले. दुपारी बारापासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट्याचा शोध घेतला. याची माहिती मिळताच आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे या ठिकाणी दाखल झाले. 

बिबट्याला पकडण्यासाठी अथवा ठार मारण्यासाठी पेटवून दिलेला 5 एकर ऊस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या मालकीचा आहे. उसाच्या तीनही बाजूने आग लावून एका बाजूला बिबट्याला पकडण्यासाठी वाघर लावण्यात आली होती. उसाच्या चारही बाजूने शार्पशूटर तैनात होते. तरीही ऊस पेटवताच बाजूला असलेल्या केळीतून शेटफळ गावाच्या बाजूला बिबट्या पसार झाला आहे. 


सहायक वन संरक्षक संजय कडु, सहायक वन संरक्षक बाळासाहेब हाके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच, बिबट्याला बेशुद्ध करणारी तीन पथके तैनात होती. शिवाय, ड्रोन कॅमेरे, बंदूकधारी कर्मचारी उपस्थित असतानाही बिबट्या पळून गेल्याने ग्रामस्थांनी वन विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

वन विभागावर नागरिक संतापले 


गेली सहा दिवसांपासून बिबट्याने करमाळा तालुक्‍यात धुमाकूळ घातला आहे. सहा दिवसांत त्याने तीन जणांचे बळी घेतले आहेत. सध्या बिबट्याचे वास्तव्य उजनी पट्ट्यात असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर केळी व उसाचे पिक आहे, त्यामुळे या भागात बिबट्याचा शोध घेणे सोपे नाही. आज बिबट्या ज्या ऊसात होता. त्याच्या तीनही बाजूने ऊस तोडलेला आहे, तर एका बाजूला केळी आहे. त्याला पकडण्याची किंवा ठार करण्याची ही सुवर्णसंधी वन विभागाच्या हातची गेली आहे. बिबट्या पळाला म्हणताच उपस्थित पाचशे ते सहाशे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 


करमाळ्यात वास्तव्य वाढण्याची शक्‍यता 


हा नरभक्षक बिबट्या आष्टी (जि. बीड) भागातून करमाळ्यात आला असल्याचा अंदाज आहे. या बिबट्याचा प्रवास दक्षिण दिशेने सुरू आहे. लिंबेवाडी येथे 4 डिसेंबर रोजी कल्याण फुंदे (वय 40), अंजनडोह येथे ता. 5 डिसेंबर रोजी जयश्री शिंदे (वय 25), तर आज सकाळी चिखलठाण येथे फुलाबाई कोठले वय (वय 8) यांचे बळी घेत बिबट्याचा प्रवास तालुक्‍यात दक्षिण दिशेने सुरू आहे. आता याला पुढे दक्षिणेकडे जाण्यासाठी उजनी धरण आडवे असल्याने या बिबट्याचे करमाळा तालुक्‍यातील वास्तव्य वाढू शकते, त्यामुळे संपूर्ण तालुक्‍यात भीतीचे वातावरण आहे.

Pages