भगीरथ भालके यांनी नेतृत्व व पालकत्व स्विकारण्यासाठी पदाधिकारी, सहकारी,कार्यकर्ते व जन सामान्यांच्या कडून वाढता दबाव.... - Pantnagari Times

Breaking News

Friday, December 4, 2020

भगीरथ भालके यांनी नेतृत्व व पालकत्व स्विकारण्यासाठी पदाधिकारी, सहकारी,कार्यकर्ते व जन सामान्यांच्या कडून वाढता दबाव....


 मंगळवेढा / प्रतिनिधी

मंगळवेढा पंढरपूरचे विद्यमान आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने मंगळवेढा तालुक्यातील त्यांचे समर्थक पोरके झाले आहेत. आमदार भालके यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांच्या हजारो समर्थकांनी सरकोली येथे जाऊन कै. भालके यांच्या प्रतिमेसमोर त्यांचे पुत्र व विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके हेच आमचे नेते असून त्यांनी आमचे नेतृत्व व कुटुंबकर्ता म्हणून स्वीकारण्याची गळ घातली आहे. भरलेल्या अश्रूंनी व गहीवरलेल्या अवस्थेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत दिवंगत आमदार भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मंगळवेढा तालुका हा तसा पारंपरिक दुष्काळी असून देखील या तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या पूर्वीच्या नेतेमंडळींनी केवळ आश्वासने देत आपले राजकारण केले. येथील शेतीच्या पाण्याचा व तालुक्याच्या विकासाचा प्रश्न रखडत ठेवला. परंतू पंढरपूर विधानसभा मतदारसंघ ओपन झाल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके यांनी मंगळवेढा तालुक्यात २००७ पासून जनसंपर्क वाढवत शेतकऱ्यांच्या व सर्वमान्यजनाच्या हितासाठी शेतकऱ्याचा मुलगा  विधानसभेत गेला पाहिजे ह्या दृष्टीने तयारी सुरू केली.  येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, सर्वसामान्य, युवकांच्या हाकेला कायम धावून गेले. येथील पाणी प्रश्नाला हात घालत दक्षिण भागाला पाणी मिळाल्याखेरीज फेटा बांधनार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली. 

भारदस्त वक्तृत्व, रांगडा स्वभाव, गोरगरिबांच्या हाकेला धावून जाण्याची वृत्ती, शासनदरबारी प्रश्न मांडून सोडवण्याची जिद्द, सामान्यांचा प्रशांसाठी आक्रमकता, कोणतेही काम मार्गी लावण्याची धमक यामुळे येथील जनतेचे ते ताईत बनले होते. कोणत्याही पक्षात असले तरी खा. शरदचंद्र पवार यांना दैवत मानत विधानसभा निवडणुकीत उतरले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके विधानसभेत पोहचले. तालुक्यातील अनेक प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवला. त्यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे अशक्य असणाऱ्या ५३० कोटींच्या  मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली. म्हैसाळ योजनेची रखडलेली कामे मार्गी लावली, शिरणानंदगी तलावात पाणी सोडले, ४० गावांची भोसे प्रादेशिक योजना, प्रांत कार्यालय, विविध कार्यालये मंजुरी व उभारणीसाठी निधी, रस्ते, पूल, बंधारे, राज्यातील सर्वाधिक तीर्थक्षेत्र विकास निधी, बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक उभारणी निधी साठी पाठपुरावा, पीकविमा, यासह अनेक  विकासकामे त्यांनी मार्गी लावली. विद्यमान सरकारकडून ३५ गावांच्या विकासाठी निधीची तरतूद करून घेतली असताना त्यांचे अकाली निधन झाल्याने मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या निधनाने तालुक्याच्या विकासावर परिमाण होणार असल्याने दिसत आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादी पक्षाचे व भालके समर्थकामध्ये पोरके पणाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आपले दुःख बाजूला ठेवत येथील हजारो समर्थकांनी व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी सरकोली येथे भालके यांच्या निवासस्थानी  जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच कै. भारत नाना यांचे पुत्र व विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांनी नानाच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी भरून काढावी. आमचे नेतृत्व स्वीकारत व कुटुंबकर्ता म्हणून पालकत्व स्वीकारावे  यासाठी आम्ही सर्वजण पाठीशी राहू, अशी भावना व्यक्त केली. कै. आमदार भारत  भालके यांच्या निधनानंतर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र कै. भालके यांचे  खा. पवार साहेबांवरील प्रेम पाहता त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आमची असून कै. भारतानानाचे पुत्र भगीरथ यांना आम्ही योग्य वेळी न्याय देऊ असे उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांनी सूचित केले असल्याने त्यांच्याकडे येथील नेतृत्व दिले जाणार आहे.  

भगीरथ भालके यांनी देखील नानांच्या मदतीने गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने हाताळत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. संचालक पदाचा अनुभव, वक्तृत्व शैली, मृदू परंतू प्रसंगी आक्रमकपना समस्यांची असलेली जाण ती सोडवण्यासाठी असलेली धडपड, सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव, युवकांचे असलेले संघटन, स्वत:चा जनसंपर्क, यामुळे त्यांनी आपले मतदारसंघात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच कै. भारत नानांचा असलेला दांडगा जनसंपर्क देखील त्यांच्या कामी येणार आहे.  कै. नानांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबाबरोबरच मतदार संघातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो समर्थकांना समजून उमजून घेण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल. तसेच भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

Pages