सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भेटणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले सोलापुरातील अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या निवडणुकीच्या वेळी बार्शी तालुक्याने भरभरुन मते दिल्याने ते निवडून आले. त्याच वेळी पवार साहेबांनी फोन करुन आभार मानले होते. विकास कामांसाठी अडचण आली तर भेटत जा, असा शब्द त्यांनी दिला आहे, अशा शब्दांत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपली आगामी वाटचाल स्पष्ट केली आहे.
दरम्यान, बार्शी शहर आणि तालुक्याच्या विकास कामासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. सरकार विरोधातलं असलं, तरी जे काही आमचे संबंध आहेत, त्यामुळे मी शरद पवारांना भेटणार आहे. बार्शी उपसा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे, असं राजेंद्र राऊत म्हणाले.