साठे यांचे 'मोठे' विधान भारत नाना यांच्या वारसदारांनांच पक्षाची उमेदवारी. उद्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार भालके कुटुंबाच्या भेटीसाठी. - Pantnagari Times

Breaking News

Thursday, December 17, 2020

साठे यांचे 'मोठे' विधान भारत नाना यांच्या वारसदारांनांच पक्षाची उमेदवारी. उद्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार भालके कुटुंबाच्या भेटीसाठी.

सोलापूर / प्रतिनिधी

आगामी काळात होणाऱ्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आ.कै.भारत भालके यांच्या वारसदारापैकी उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादीकडून पक्षाचे संस्थापक खा.शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

त्यामुळे कै.भालके यांच्या वारसदाराशिवाय इतर कोणालाही राष्ट्रवादी कडून उमेदवारी दिली जाणार नाही. इतरांनी उमेदवारीची पक्षाकडून अपेक्षा करु नये. कै.भालके यांच्या पत्नी जयश्री अथवा पुत्र भगिरथ यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी , नानांच्या वारसदाराला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्विकारली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिली.

आ.भालके यांच्या आकस्मित निधनामुळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सध्या भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर आहे. पक्षाकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके अथवा पुत्र भगीरथ भालके यांच्यापैकी कोणाला उमेदवारी देण्यात येणार याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.

या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.कै.भालके यांच्या वारसदारांना उमेदवारी देऊन निवडून आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी.यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही साठे यांनी सांगितले.

या दोघांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. उद्या शुक्रवारी खा.शरद पवार हे सांत्वनपर भेटीसाठी कै.भालके यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pages