मंगळवेढा - प्रतिनिधी
पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे मंगळवेढ्यातील त्यांचे बंद असलेले संपर्क कार्यालय जनतेच्या संपर्कासाठी खुले झाले आहे.
अकरा वर्षांपासून जनतेच्या संपर्कात असलेले (स्व.) आमदार भारत भालके यांचे पुणे येथे उपचारादरम्यान 27 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या दिवसापासून हे संपर्क कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रलंबित शासकीय कामांसाठी शहर व ग्रामीण भागातून ये - जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती. शहर व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या अडचणीत मोठी मदत केल्याने आमदार भालके हे त्यांचे मोठे आधारवड होते. परंतु त्यांच्या अकाली जाण्याने गोरगरिबांचे हे आधारवड गेल्याने शहर व तालुक्यामध्ये शोककळा पसरली असतानाच प्रलंबित कामांच्या निपटाऱ्यासाठी हे संपर्क कार्यालय कधी खुले होणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली होती.
दरम्यान, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील (स्व.) आमदार भालके समर्थकांनी सरकोली येथे विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांचे सांत्वन करून, आमदार भालके यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठीशी आहोत, असा धीर दिला दिल्याने भालके कुटुंबीयांसह मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी गटावरील दुःख बाजूला ठेवत संपर्क कार्यालय जनतेच्या सेवेसाठी खुले झाले आहे.
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे आलेला दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी हे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय भगीरथ भालके यांनी घेतला आहे. दु:खाचा डोंगर खांद्यावर घेत हे कार्यालय जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. (स्व.) भारत भालके यांच्याकडे असणारा मोबाईल क्रमांक भगीरथ भालके यांच्याकडे असून नागरिकांनी आपल्या कामासाठी नेहमीप्रमाणे मोबाईलवर संपर्क साधावा अथवा संपर्क कार्यालयात भेटावे.
- रावसाहेब फटे,
स्वीय सहायक