मंगळवेढा / प्रतिनिधी
आमदार भारत भालके यांचे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज (ता.29 डिसेंबर) जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन या योजनेच्या कामासाठी लेखाशीर्ष खाते उघडण्यासंदर्भात निवेदन दिले. त्या वेळी पाटील यांनी लेखाशीर्ष खाते उघडण्याचे आदेश दिले असून निधीही देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील उजनीच्या अपूर्ण कामासाठी त्यांनी जयंत पाटील यांना साकडे घातले आहे, त्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक जलसंपदा मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आमदार भालके यांनी ता. 23 नोव्हेंबर रोजी उपचार घेत असताना त्यांचे स्वीय सहायक रावसाहेब फाटे यांना "व्हॉट्स ऍप' द्वारे मेसेज पाठवून 35 गावांसाठी अर्थसंकल्पात दहा कोटी तरतूद केल्याचे सांगितले होते. परंतु, कोरोना महामारीच्या कालावधीत सरकारने सर्व विभागाचा निधी थांबवल्याने या योजनेचे लेखाशिर्ष खाते उघडले नव्हते. खाते उघडण्यासाठी भगिरथ भालके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. त्या खात्यावर निधी वर्ग करण्यासंदर्भात मदत करावी, अशी विनंती भालके यांनी केली.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी महाविकास आघाडीने 10 कोटींची निधीची तरतूद केली होती, त्यापैकी काही टोकन निधी या योजनेसाठी मिळावा, त्यासाठी या योजनेचे लेखाशीर्ष खाते उघडावे, उजनीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 65 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली होती, तोही निधी मिळावा, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उर्वरीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी भगिरथ भालके यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली.
पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे लेखशीर्ष उघडण्याचे आदेश दिले. तसेच, उजनीच्या अपूर्ण कामांची अंदाजपत्रक सादर करावे. निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. आमदार भालके यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या 35 गावच्या उपसा सिंचन योजनेस निधी कमी पडू देणार नाही, ती योजना मार्गी लावू, असे आश्वासन पाटील यांनी दिले. जलसंपदा विभागाकडील अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला जलसंपदा विभागातील सचिव, मंत्रालयीन उच्यस्तरीय अधिकारी, कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथील अधिकारी उपस्थित होते.