मंगळवेढा / प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या पाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या दक्षिण भागातील 35 गावांच्या पाण्यासाठी आमदार भारत भालके यांनी रुग्णालयातून स्वीय सहायक रावसाहेब फटे यांना मोबाईलवर मेसेज पाठवून पुत्र भगीरथ भालके व या भागातील कार्यकर्त्यांना घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन द्यावे, अशी सूचना केली. आमदार भालके यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील 35 गावांच्या पाण्याचा पाठपुरावा सोडला नाही.
2008 मध्ये तालुक्यातील भाळवणी येथील येथील जिल्हा परिषद शाळेच्या शताब्दी कार्यक्रमात बोलताना आमदार भालके यांनी, केवळ नकारात्मक भूमिका ठेवल्यामुळे तालुका विकासापासून दूर असल्याची भूमिका मांडत विधानसभेचे रणसिंग फुंकले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उद्भवलेल्या 35 गावांच्या पाणी आंदोलनातील आंदोलकांना हाताशी धरत पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी डीपीआर, सर्वेक्षण, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता असे अनेक अडथळे पार करून 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यात प्रशासकीय मान्यता घेत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर शासनाने निधीसाठी आखडता हात घेतला.
तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी तर ही योजना म्हणजे गंडवागंडवी असल्याचे सांगून या भागातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु न्यायालयात सरकारच्या शपथपत्रामुळे मंत्री देखील उघडे पडले. निधी मिळावा म्हणून आंदोलक स्व. जयसिंगराव निकम व इतरांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान, या योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर तत्कालीन सरकारने या योजनेतील पाणी व गावे कमी करण्याचा घाट घातला. त्या वेळी या भागातील लोकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली. अशातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भालके यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात या योजनेच्या कामासाठी बैठक लावली आणि मूळ योजनेत असलेली गावे कायम ठेवण्याचा आदेश घेतला. या योजनेसाठी मोठा पाठपुरावा केला. एखाद्या अधिकाऱ्याने चुकीचे उत्तर दिले, तर त्याला "माझ्या शिक्षणातील अभ्यासापेक्षा 35 गावच्या पाण्याचा अभ्यास जास्त झाला' असे खडे बोल सुनावत होते.
पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्यांनी स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करत पाठपुरावा कायम ठेवला. दुर्दैवाने रुग्णालयात असताना देखील त्यांनी स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांना मेसेज पाठवून पुत्र भगीरथ भालके व इतर आंदोलकांना बरोबर घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करावा, असे सांगितले होते. परंतु त्यांच्या अकाली निधनाने हा प्रश्न रखडण्याची शक्यता असताना, विधिमंडळात शोकसभे दरम्यान सर्वच मंत्र्यांनी "ही योजना मार्गी लावणे ही आमदार भालके यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सूतोवाच केल्यामुळे या योजनेबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या.