नाशिक / प्रतिनिधी
मुंबई आग्रा रोडवरील एका हॉटेलमध्ये आयोजीत केलेल्या विवाह सोहळ्यातून चोरट्याने नववधुसह तिच्या आईचे व भावजयीचे दागिने आणि रोकड असलेली पिशवी एका चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पिशवीत सुमारे ११ लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड होती. याप्रकरणी सुरेश मदनलाल बजाज (५५, रा. शहापूर, जि. ठाणे) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
सुरेश बजाज यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.८) त्यांच्या मुलीचे लग्न होते.
मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा सुरु होता. लग्नविधी करीता बजाज हे स्टेजवर बसले होते. त्यावेळी एक मुलगा हातात हँडबॅग घेऊन हॉल बाहेर जाताना बजाज यांचे सहकारी रामचंद्र बेलवले यांना दिसला. त्यामुळे बेलवले यांनी बजाज यांच्याकडे मुलाबाबत विचारणा केली असता त्यांनी दागिने आणि रोकड ठेवलेल्या पिशवीची पाहणी केली असता ती आढळून आली नाही. बजाज व इतरांनी त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आढळून आला नाही.
संबंधीत मुलानेच दागिने आणि रोकड ठेवलेली पिशवी चोरल्याचा अंदाज आल्याने बजाज यांनी इंदिरानगर पोलिसांकडे धाव घेत चोरीची फिर्याद दाखल केली आहे. या पिशवीत १३ तोळे सोन्याचे दागिने, ५ लाखांचे हिऱ्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड असा १० लाख ८२ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.