Breaking : राज्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार ?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात… - Pantnagari Times

Breaking News

Sunday, November 22, 2020

Breaking : राज्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार ?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…


 

मुंबई / प्रतिनिधी

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. दोन – तीन दिवस परिस्थितीची समीक्षा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले आहेत. संबंधित विभागांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्सव काळात अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

आम्ही २ ते ३ दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतर लॉकडाऊन करायचा की नाही, याबद्दलचा निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले. ‘दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बरीच गर्दी पाहायला मिळाली. कोरोना या गर्दीत आपोआप मरून जाईल की काय अशी परिस्थिती होती. कोरोनाची दुसरी लाट येईल असं आता म्हटलं जात आहे. सरकारनं अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं पवार यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांचा आकडा वाढला

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे ५ हजार ७६० नवे रुग्ण आढळून आले. तर ६२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ४६ हजार ५७३ वर पोहोचली. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख ४७ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७९ हजार ८७३ जणांवर उपचार सुरू आहेत.

Pages