सोलापूर - प्रतिनिधी
अनगर (ता. मोहोळ) येथील लोकनेते साखर कारखान्यातील बायोगॅसची टाकी अचानक खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य आठजण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 21) रात्री पावणेबाराच्या सुमारास कारखान्याच्या आसवनी विभागात घडली.
ज्योतिराम दादा वगरे (वय 45), सुरेश अंकुश चव्हाण (वय 22, दोघेही रा बिटले) अशी मृतांची नावे आहेत. सज्जन बाळू जोगदंड (रा. बिटले), मंगेश नामदेव पाचपुंड (रा. अनगर), महेश दिलीप बोडके (रा. अनगर), कल्याण किसन गुंड (रा. बिटले), परमेश्वर मधुकर थिटे (रा. नालबंदवाडी), राजू दत्तात्रय गायकवाड (रा. कुरणवाडी), रवींद्र गजेंद्र काकडे (रा. अनगर), संजय बाजीराव पाचे (रा. अनगर) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून जखमींची प्रकृती स्थिर आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनगर (ता. मोहोळ) येथील लोकनेते साखर कारखान्याचे नेहमीप्रमाणे गाळप सुरू आहे. त्याचबरोबर सहवीज निर्मिती व आसवनी प्रकल्पही सुरू आहे. शनिवारी रात्री पावणेबारा वाजता आसवनी विभागातील बायोगॅस डायजेस्ट गॅस टाकी अचानक खाली कोसळली, त्यामुळे त्यातून मिथेन गॅस व द्रवरूप वायू बाहेर पडून त्यात गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली. या घटनेची खबर डॉ. तेजस्विनी तात्यासाहेब जाधव (वय 27, मोहोळ ग्रामीण रुग्णालय) यांनी दिली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे करीत आहेत.