मोहोळ / प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे बॅंक ऑफ इंडिया व टाटा इंडिकॅश असे दोन एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कट करून त्यातून पाच लाख 12 हजार रुपयाची रोख रक्कम चार अनोळखी चोरट्यानी चोरून नेल्याची घटना ता. 23 रोजी मध्यरात्री घडली असून चोरटे स्विफ्ट गाडीतून फरार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील आष्टी येथे टाटा इंडिकॅश व बॅंक ऑफ इंडिया असे दोन एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी टाटा इंडिकॅशच्या एटीएममध्ये ता. 23 रोजीपर्यंत 5 लाख 3 हजार 400 रूपये शिल्लक होते. एटीएम सेंटरच्या बाजुला कोल्ड्रिंगचे दुकान असून त्या दुकानाचे व एटीएम सेंटरचे शटर बंद करून महेश भानवसे हा कामगार घरी गेले होता.
दरम्यान, ता. 23 रोजी रात्री अज्ञात चार चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने फोडून त्यातील 5 लाख 3 हजार 400 रुपये काढून घेतले व त्याच परिसरात असलेल्या दुुसऱ्या बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर जाऊन ती मशीन गॅस कटरने कट करून त्यातील नऊ हजार रुपये असे दोन्ही एटीएममधील पाच लाख बारा हजार 400 रुपये चोरले. दरम्यान, बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम शेजारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास तीन ते चार व्यक्ती संशयरित्या थांबल्या असल्याचे गावातील अरविंद भीमराव पाटील यांनी पाहिले. पाटील यांनी त्यांना हटकले असता चोरट्यांनी त्यांना दगड भिरकावून जखमी करण्याचा प्रयत्न केला व सोबत आणलेल्या स्विफ्ट गाडीमधून ते शेटफळच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी महेश दत्तू भानवसे या टाटा इंडिकॅश कंपनीच्या कामगाराने मोहोळ पोलिस ठाण्यात अज्ञात चार व्यक्तींवर एटीएम मशीन तोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे करीत आहेत.