लस लवकर येऊ दे,अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे!उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री.विठ्ठलाच्या चरणी साकडं.... - Pantnagari Times

Breaking News

Thursday, November 26, 2020

लस लवकर येऊ दे,अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे!उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री.विठ्ठलाच्या चरणी साकडं....


 पंढरपूर / प्रतिनिधी


कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. 

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज गुरुवारी पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री. पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

श्री. पवार म्हणाले, "अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्‍यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल - रुक्‍मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रा प्रथा - परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे.' 


राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख हलकं करण्याची ताकद शासनाला दे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केली असल्याची सांगून श्री. पवार म्हणाले, श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रद्धा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आदी गोष्टी काटेकोरपणे अमलात आणाव्या लागतील. 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून त्यांनी, दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहीद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल, असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी बुधवारी रात्री उशिरा श्री. पवार यांचे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. विश्रांती घेतल्यानंतर आज (गुरुवारी) पहाटे दोन वाजता श्री. पवार यांचे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात सपत्निक आगमन झाले. 

पहाटे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी श्री विठ्ठलाच्या पूजेला सुरवात झाली. प्रथेप्रमाणे पूजा झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी विठुरायाचा जयघोष केला. त्यानंतर श्री रुक्‍मिणीमातेचीही पूजा करण्यात आली. 


आषाढी आणि कार्तिकी एकादशी दिवशी शासकीय महापूजांच्या वेळी अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि पदाधिकारी यांची मंदिरात गर्दी होत असते. परंतु कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आषाढीप्रमाणेच कार्तिकीची शासकीय महापूजा मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला होता. त्यानुसार आज श्री विठ्ठल - रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात पूजेच्या वेळी मंदिरातील पुजारी, अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, मानाचे वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेले श्री विठ्ठल मंदिरातील वीणेकरी कवडुजी भोयर व त्यांच्या पत्नी कुसुमबाई, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, नगराध्यक्षा साधना भोसले, शकुंतला नडगिरे, पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे दत्तात्रय चिकोर्डे, सुधीर सुतार आदी उपस्थित होते. 

पूजेनंतर श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री. पवार यांचा तर श्री. पवार यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिर समितीच्या "दैनंदिनी 2021'चे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. 

वीणेकरी श्री. भोयर यांना मान... 

श्री विठ्ठल मंदिरात वीणेकरी म्हणून पहारा देणाऱ्या सात जणांपैकी चिठ्ठी टाकून श्री. भोयर यांची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. श्री. भोयर हे गेल्या दहा वर्षांपासून वीणेकरी म्हणून पहारा देण्याचे काम करत आहेत. ते मूळचे डौलापूर (पो. मोझरी शेकापूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील आहेत. या दाम्पत्याला श्री. पवार यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्या वतीने एक वर्षाचा मोफत प्रवासाचा पास देण्यात आला. 

फुलांची मनमोहक सजावट... 

या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांच्या वतीने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात रंगीबेरंगी मनमोहक फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यासाठी झेंडू, ऑरकेट, गुलाब, कार्नेशन, आष्टर, शेवंती, जरबेरा, कागडा, तुळशी, कामिनी, ग्लॅडिओ या फुलांचा सुमारे पाच टन वापर करण्यात आला. ही आरास मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली. तसेच श्री विठ्ठलाच्या सभामंडपात पुणे येथील प्रसिद्ध रांगोळी छायाचित्र कलाकार गणेश माने यांनी अप्रतिम रांगोळी काढली आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर मनमोहक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. 

चंद्रभागा तीर सुनासुना... 

दरवर्षी आषाढी, कार्तिकी एकादशी दिवशी चंद्रभागा नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी यात्रेसाठी आलेले लाखो वारकरी पहाटे चारपासूनच गर्दी करत असतात. यंदा मात्र आषाढीप्रमाणेच कार्तिकीतही वारकऱ्यांना पंढरपूरला येण्यास मनाई करण्यात आलेली असल्याने आज चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांच्या अभावी सुनासुना दिसत होता. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी यात्रेच्या वेळी दक्षता म्हणून वारकऱ्यांना पंढरपूरला येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे पालखी सोहळा आणि कोणीही वारकरी पंढरपूरला येऊ शकले नव्हते. आषाढीनंतर चार महिन्यांनंतर आज कार्तिकी यात्रेच्या वेळी देखील कोरोनाचा धोका संपला नसल्याने आषाढी प्रमाणेच कार्तिकी यात्रा देखील प्रतिकात्मक होत असून, यात्रेवर अनेक प्रकारचे निर्बंध शासनाने घातले आहेत. त्यामुळे यात्रेसाठी वारकरी येऊ शकले नाहीत.

Pages