मंगळवेढा / प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या डाळिंब खरेदी - विक्री लिलावात जत येथील शेतकऱ्याच्या डाळिंबाला प्रति किलो 511 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. निर्यातक्षम डाळिंबापेक्षा दुसऱ्यांदा एवढा जास्त दर या डाळिंबाला मिळाला.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे व श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब खरेदी - विक्री सौदे सुरू करण्यात आले आहेत. आठवड्यातील प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारच्या सौदे लिलावत सोलापूर, पंढरपूर,
सांगोला, जत, मोहोळ व कर्नाटक या भागातून डाळिंबाची आवक वाढू लागली आहे. मंगळवेढा येथील खरेदीदार डाळिंब खरेदी करून दिल्ली, गुजरात, मुंबई, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार व आसामला पाठवत असल्याने डाळिंबास चांगला दर मिळू लागला आहे.
मोहन माळी या आडत दुकानात झालेल्या डाळिंब सौद्यात रावसाहेब लवटे (रा. जत) या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 511 रुपयांचा दर देत राम बाबर (सांगोला) यांनी खरेदी केला. तर कुमार चिकोडी (रा. जत) व दत्ता धाइंगडे (रा. वाकी, ता. सांगोला) या शेतकऱ्यांना खरेदीदार आकाश गुजर यांच्याकडून 502 रुपये असा दर मिळाला. तर आनंद लवटे व सुरेश माळी (रा. जत) यांनाही चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वेळी बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, उपसभापती प्रकाश जुंदळे, सचिव सचिन देशमुख, मोहन माळी, रामचंद्र बाबर, आकाश गुजर, विनायक शेंबडे, भानुदास सलगर, दत्तात्रय शिंदे व विनायक आवताडे आदी उपस्थित होते.