मंगळवेढा / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत व संगीतप्रेमींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गतवर्षी राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन घेण्यात आले. त्यास उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभल्यानंतर यावर्षीचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन 15 व 16 ऑगस्टला मंगळवेढयात होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन असल्यामुळे यावर्षीचे संमेलन हे ऑनलाईन घेण्यात येणार असून प्रत्येकाला घरबसल्या दोन दिवसाच्या साहित्य संमेलनाची मेजवानी आपल्या मोबाईल अथवा टी.व्ही.वर घेता येणार आहे. यासाठी पहिल्या दिवशी साहित्य संमेलन होणार असून त्यात महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक व कवी सहभाग नोंदवणार असून दुसर्या दिवशीच्या संगीत संमेलनात महाराष्ट्रातील गायन व संगीत क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या दोन दिवसीय संमेलनाचे नियोजन सुरू असून सुरसंगम म्युझिकल ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर, अ.भा.मराठी नाटय परिषद मुंबई शाखा मंगळवेढा हे मुख्य संयोजक असून संयोजन समितीमध्ये विविध संस्थांना सामावून घेण्यात येणार असून सहभागी होवू इच्छिणार्या संस्थांच्या प्रमुखांनी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन म.सा.प.शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी केले आहे.