हुलजंतीच्या श्रीदेवी म्हेत्रे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह - Pantnagari Times

Breaking News

Saturday, May 2, 2020

हुलजंतीच्या श्रीदेवी म्हेत्रे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह


मंगळवेढा / प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलात उत्तम कामगिरी व उत्कृष्ट सेवा बजाविल्याबद्दल हुलजंती (ता.मंगळवेढा) येथील श्रीदेवी म्हेत्रे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

राज्याच्या गृहविभागाने पोलीस महासंचालक सन्मानपत्र प्राप्त पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यादी जाहीर केली आहे. या यादीत सोलापूर शहर विभागात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या श्रीदेवी म्हेत्रे यांचा समावेश आहे. श्रीदेवी म्हेत्रे या २०१३ पासून पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या सात वर्षाच्या सेवेत अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात विविध पदके त्यांनी पटकाविली आहेत. याच कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पदकप्राप्त अधिकारी व कर्मचारीवर्गात त्या एकमेव महिला पोलीस कर्मचारी आहेत.

श्रीदेवी म्हेत्रे यांचे प्राथमिक शिक्षण हुलजंती येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आश्रमशाळा, बालाजीनगर येथे झाले आहे. श्रीदेवी म्हेत्रे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सोलापूरचे माजी महापौर लालसिंग रजपूत, झेप परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मेलगे, हुलजंतीचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Pages