मुख्यमंत्री सहायता निधीस दिव्यांग कृष्णाने दिला ‘खाऊ’ - वाढदिवस साजरा न करता प्रशासनाकडे निधी सुपुर्द - Pantnagari Times

Breaking News

Thursday, April 30, 2020

मुख्यमंत्री सहायता निधीस दिव्यांग कृष्णाने दिला ‘खाऊ’ - वाढदिवस साजरा न करता प्रशासनाकडे निधी सुपुर्द


यवतमाळ / प्रतिनिधी

  कोरोना विरुध्दची लढाई शासन, प्रशासन, सर्व यंत्रणा, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपल्यापरीने लढत आहेत. या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्यापरीने शासनास मदत करीत आहेत. यवतमाळमध्येसुध्दा एका दिव्यांग मुलाने वर्षभर जमविलेला ‘खाऊ’ चक्क मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपल्या वाढदिवसाची अनोखी भेट कोरोना लढाईसाठी दिली.  

येथील वडगाव रोड भागातील जयसिंगपुरे ले-आऊटमध्ये राहणारा कृष्णा विनोद राऊत (13) हा जन्मत: दिव्यांग आहे. बुधवारी 29 एप्रिल रोजी त्याचा 13 वा वाढदिवस होता. मला कोणीही वाढदिवसाला काहीही भेट आणू नका तर कोरोनाची लढाई नेटाने लढणाऱ्या आपल्या मुख्यमंत्र्यांना मलाच ‘खाऊ’ भेट म्हणून द्यायचा आहे, असे त्याने सर्वांना सांगितले. आपला वाढदिवस साजरा न करता वर्षभर गोळा केलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची ही कल्पना त्याने आई, वडिलांना सांगितली. त्याचे वडील घरोघरी जाऊन हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. 

हातावर पोट असलेल्या त्याच्या पालकांनीही मुलाच्या मताचा आदर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या खाऊचे पैसे असलेली ‘मनी बँक’ जशीच्या तशी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे ठरवून राऊत कुटुंबीय थेट यवतमाळ तहसीलदारांकडे पोहचले. तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्याकडे कृष्णाने आपला ‘खाऊ’ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. ही बाब जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना कळताच त्यांनी कृष्णाला आपल्या कार्यालयात बोलवुन घेतले. त्याची व कुटंबाची आस्थेने विचारपुस केली. यावेळी कृष्णाचे वडील विनोद राऊत हेसुध्दा उपस्थित होते.


     कोरोनाच्या या लढाईत प्रत्येकाने आपले योगदान देण्याकरीता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याकरीता Chief Minister’s Relief Fund-COVID 19, Savings Bank Account number 39239591720, State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023, Branch Code 00300, IFSC CODE- SBIN0000300 

तसेच मराठीत - मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023, शाखा कोड 00300, आयएफएससी कोड SBIN0000300 येथे थेट धनादेश जमा करू शकतो.

Pages