प्राचार्य आप्पासाहेब पुजारी यांचे दातृत्व : मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, April 29, 2020

प्राचार्य आप्पासाहेब पुजारी यांचे दातृत्व : मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत


मंगळवेढा / प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूंच्या साथीने थैमान घातले असताना या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. शासनाच्या प्रयत्नात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.आप्पासाहेब गोविंद पुजारी यांनी एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केली.

मुख्यमंत्री सहायत्ता निधीचा धनादेश मंगळवेढा-सांगोला विभागाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी डॉ. पुजारी यांच्या समवेत त्यांच्या पत्नी शकुंतला पुजारी, नातू पार्थ घारगे उपस्थित होते. कोरोना विषाणूंच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मदतीसाठी आवाहन केले जात आहे . या आवाहनाला प्रतिसाद देत मूळचे कर्नाटकाचे व सध्या महाराष्ट्रात स्थयिक झालेले सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पुजारी यांनी मुख्यमंत्री सहायत्ता निधीस एक लाख रुपये देत हातभार लावला आहे.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. पुजारी यांनी याअगोदरही मुंबई येथे होत असलेल्या विठ्ठल मंदिरास पाच लाख रुपये, माढा येथील विठ्ठल मंदिरास अर्धा किलो चांदी, कोल्हापूर येथील शाळेस एक लाख अकरा हजार रुपये तसेच विविध सामाजिक उपक्रमास मदतीचा हात दिला आहे. आता सेवनिवृत्तीनंतरचे जीवन शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शनवर जगत असताना जवळपास दोन महिन्याची पेन्शन रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. 


महिन्याकाठी मिळणाऱ्या पेन्शनमधून मदतीचा हात देणाऱ्या डॉ.पुजारी यांच्या दातृत्वाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकी जपत हातभार लावला तर लवकरच आपण कोरोना विरुद्धच्या लढ्यात यशस्वी होऊ.

- उदयसिंह भोसले, प्रांताधिकारी, मंगळवेढा-सांगोला


कोरोना साथीच्या संकटसमयी प्रत्येकाने शासनाला मदत करणे गरजेचे आहे. शासनाला विविध व्यक्ती, संस्था मदत करीत आहेत बळ देत आहेत म्हणून आपणही खारीचा वाटा उचलला आहे. या काळात सेवा देणाऱ्या सर्वांच्याच चरणी आपण नतमस्तक होऊयात. 

- प्रा.डॉ.आप्पासाहेब पुजारी, सेवानिवृत्त प्राचार्य, आंधळगाव, ता.मंगळवेढाPages