मंगळवेढा / प्रतिनिधी
---------------------------
भोसे ता. मंगळवेढा येथे मळणी मशीन पाहण्यासाठी कारमधून प्रवास करताना चालकाचा कारवरचा ताबा सुटला. यात कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात शंकर शिवाजी फुंदे (वय 23) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भोसे- घेरडी रस्त्यावर घडली.
भोसे येथील शंकर शिवाजी फुंदे व रवी सदाशिव पाटील अन्य एका छोट्या मुलाला घेऊन कारने अवताडेवाडीकडे निघाले होते. चालक रवी पाटील याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याबाजूला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात शेजारी बसलेल्या शंकर शिवाजी फुंदे यांच्या डोक्यास व डोळ्यास झाडाचा जबरदस्त मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. चालक रवी पाटील यास किरकोळ जखम झाली असून लहान मुलाला कसलीही इजा झाली नाही. या घटनेतील मृत शंकर फुंदे या युवकाच्या वडिलांचे निधन झाल्याने आपल्या आईसमवेत आजोळी भोसे येथे राहत होता. मिळेल ते काम करून हे कुटुंब उपजीविका करत असताना या दुर्दैवी घटनेत शंकर फुंदे याचा मृत्यू झाल्याने भोसे गावावर शोककळा पसरली. सदर घटनेची खबर रामदास गणपत महाडिक यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली.
सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे करत आहेत.