सोलापूर / प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील १७९ मार्गावर संपूर्ण वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आंतरराज्य व आंतरजिल्हा जोडणारे २०९ मार्ग असून त्यापैकी १७९ मार्ग ३ मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत. उर्वरित ३० मार्ग अत्यावश्यक सेवेकरीता पोलीस नियंत्रणामधले सुरु ठेवण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या आदेशात नमूद केले आहे की, शेजारील जिल्ह्यात असलेल्या स्वत्:च्या शेतात पायी जाण्यासाठी परवानगी देण्यात येईल. मात्र वाहनाने जाण्यासाठी अत्यावश्यक सेवा वाहतुकीसाठी सुरू असलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. शेजारील जिल्ह्यात अत्यावश्यक कामाकरीता वाहनाने जाण्यासाठी पोलीस अधीक्षक यांची ऑनलाईन परवानगी घ्यावी. वाहतुकीकरीता बंद केलेल्या मार्गाबाबत sp.solapur.r@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर येत्या तीन दिवसात सूचना अथवा तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन श्री. मनोज पाटील यांनी केले आहे.
वाहतुकीकरीता बंद केलेल्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी गावातील तरुणांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना ओळखपत्र, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर पोलीस विभागाकडून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाचशे पोलीस कर्मचारी आणि होम गार्ड आणि आरसीपीची तीन पथकेही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली आहे.