सोलापूर जिल्ह्याला मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी लाभले जिल्ह्याचे भाग्यच.. - Pantnagari Times

Breaking News

Monday, April 13, 2020

सोलापूर जिल्ह्याला मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी लाभले जिल्ह्याचे भाग्यच..


मंगळवेढा / मदार सय्यद

           सोलापूर जिल्ह्याला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा मुक्काम डाक बंगल्यात आहे. दीड महिन्यापासून कुटुंबापासून दूर राहून मेसचा डबा तर कधी इतर अधिकारी यांनी पाठविलेले जेवण घेत दिवसभराच्या बैठकांमध्ये ते व्यस्त राहत आहेत. जिल्हाधिकारी शंभरकर यांचा पदभार घेतल्यापासून डाक बंगल्यातच मुक्काम आहे. राजेंद्र भोसले यांच्या बदलीनंतर त्यांनी पदभार घेतला खरा, पण तेव्हापासून ते नूतन पालकमंत्री व विभागीय आयुक्त आणि मंत्रालयाच्या बैठकांमध्ये महिनाभर व्यस्त राहिले. दरम्यान भोसले यांनी महावितरणकडे झालेली बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्याने ‘शिवदर्शन’ हा बंगला लवकर रिकामा केला नाही. दुसरीकडे नियुक्ती मिळाल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी हा बंगला रिकामा केला. त्यानंतर बांधकाम विभागाने बंगल्याची रंगरंगोटी सुरू केली. यादरम्यान मुलांच्या परीक्षा असल्याने त्यांचे कुटुंबीयही मुंबईलाच राहिले होते. बंगल्याची रंगरंगोटी सुरू असतानाच कोरोनाच्या साथीचे काम सुरू झाले. यामुळे रंगरंगोटीचे कामगार निघून गेले. त्यामुळे शंभरकर यांना बंगला मिळालाच नाही. त्यामुळे डाकबंगल्यातच मुक्काम करून दिवसभर कोरोना साथीच्या लढ्याच्या तयारीला ते जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. रात्री उशिरापर्यंत विविध विभागांच्या बैठका यामुळे त्यांना कुटुंबीयांनाही वेळ देता आला नाही. डाक बंगल्यात मुक्काम असल्याने ते मेसचा डबा खातात. सकाळी नाश्ता केल्यानंतर कार्यालयाकडे जात असतानाच सोबत डबा नेतात. दुपारी तीन किंवा चार वाजता भोजन होते. त्यानंतर रात्री परतल्यावरच साधा आहार ते घेतात. अधिकारी आणतात डबा डाक बंगल्यात ते एकटेच राहतात याची बऱ्याच जणांना माहिती असल्याने रात्री त्यांना भेटावयास येणारे अधिकारी डबा आणतात. त्यांच्याबरोबर ते जेवण शेअर करतात. महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव हे आवर्जून त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी येतात. सोलापूर जिल्ह्याला असे जिल्हाधिकारी लाभणे म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे भाग्यच म्हणावे लागणार आहे.

Pages