मंगळवेढा / प्रतिनिधी
------------------------------
मंगळवेढा पोलिस स्टेशन आवारातून वाळूने भरलेला ट्रक पळवून नेणारा चार वर्षे फरारी असलेला आरोपी बबलू मिरासो मुल्ला (वय.३५ वर्षे,रा.मिरज) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान त्याला अटक करून न्यायाधीश आर. व्ही. नडगदल्ली यांच्यासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.मंगळवेढयाचे तत्कालीन तहसीदार यांनी चोरटया वाळू वाहतुकीविरूध्द मोहिम उघडली होती.दरम्यान ९ ऑगस्ट २०१५ रोजी २९ मालट्रक वाळू घेवून जाणारे पकडून ते सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवेढा पोलिस स्टेशन आवारात आणून लावले होते.
याच्या सुरक्षिततेसाठी माचणूर येथील कोतवाल संजय राजाराम कुरवडे, हाजापूर येथील बाळासाहेब माने या दोघांना आळीपाळीने दिवस - रात्र नेमले होते.यांची नजर चुकवून आरोपी तथा चालक बबलू मुल्ला याने एम.एच ५०,४५८१ हा वाळूने भरलेला ट्रक सकाळी ९.३० वा. आवारातून पळवून नेण्यात आला होता.
या प्रकरणी कोतवालाने फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.डी.वाय.एस . पी. दत्तात्रय पाटील व पोलिस निरिक्षक गुंजवटे यांनी पेंडींग गुन्हे निर्गित करण्याचे काम सुरु केले असून आरोपी चार वर्षे फरार असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीचा शोध घेवून ५ मार्च रोजी अटक करून न्यायालयात उभे केले.
तपासिक अंमलदार सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव मारकड यांनी चालकाने कायदेशीर दंड चुकविण्यासाठी ट्रक पळवून नेला आहे.तो जप्त करावयाचा आहे ट्रकमधील वाळूची कोठे विल्हेवाट लावली याचा शोध घेणे ट्रक सध्या कोणाच्या ताब्यात आहे याचा तपास करणे व अन्य आरोपींचा शोध घेणे यासाठी पोलिस कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.