जत्रा, सामाजिक कार्यक्रमांवर 31 मार्चपर्यंत बंदी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे गर्दी टाळण्याचे आवाहन. - Pantnagari Times

Breaking News

Saturday, March 14, 2020

जत्रा, सामाजिक कार्यक्रमांवर 31 मार्चपर्यंत बंदी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे गर्दी टाळण्याचे आवाहन.


सोलापूर / प्रतिनिधी

------------------------------

         कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये,  यासाठी  जिल्ह्यातील सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम,  जत्रा, यात्रा, ऊरुस, धार्मिक व सास्कृतिक  कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर आजपासून ते 31 मार्च 2020 पर्यंत बंदी  घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपत्ती  व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये हे आदेश आज जारी केले आहेत.

या आदेशात नमूद करण्यात आले आहे की,  जिल्ह्यातील यात्रा, जत्रा, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात  पुजारी किंवा धर्मगुरु यांना विधीवत पुजा करण्यास किंवा पंरपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थित करण्यास बंदी असणार नाही.  खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतु या दोन्ही बाबतीत वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा मुख्याधिकारी, नगरपालिका किंवा आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांची त्यांचे कार्यक्षेत्रातील अशा कार्यक्रमासाठी लेखी पुर्वपरवानगी घ्यावी लागेल.या आदेशात पुढे म्हटले आहे की,  सर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद व आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांना त्यांचे-त्यांचे कार्यक्षेत्रात होणा-या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच फक्त विधिवत पुजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

तहसिलदार किंवा मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन अशा गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल.  यासाठी संबंधित सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी व आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही या आदेशात नमूद  करण्यात आले आहे.

Pages