दुपारी एक वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज : दोन वाजता आमदार भारत भालके विधानसभेत - Pantnagari Times

Breaking News

Thursday, February 27, 2020

दुपारी एक वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज : दोन वाजता आमदार भारत भालके विधानसभेत


मंगळवेढा / प्रतिनिधी

---------------------------


         किरकोळ आजारातून झालेल्या शस्त्रक्रियेनंतर काल दुपारी एक वाजता आमदार भारत भालके यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तडक दोन वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपस्थित राहून  विधानसभेत आवाज उठविला.

गेल्या दोन  दिवसापासून आ. भालके हे आजारी असून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. विधानसभेत मतदारसंघातील प्रश्न व कामे असल्याने डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले असतानाही सकाळी डिस्चार्ज घेऊन ते विधानसभेत दाखल झाले. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने बँकांवर कारवाईची मागणी भालके यांनी केली.

सरकारकडून मार्च अखेर कर्जपुरवठा करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र जिल्ह्यात मार्चच्या आधी पिकांची काढणी होते. काढणीनंतर शेतकऱ्याना कर्जाचा उपयोग काय होणार?  पीक कापणीनंतर कर्जवाटपाची नवी पद्धत सरकार  सुरू करणार काय, असा सवाल केला.

सोलापूर रब्बीचा जिल्हा असून शेतकऱ्यांचे  गारपीट, जळीत,अवकाळी पाऊस, महापूर यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले परंतु  त्यांना काहीच मदत झाली नाही. त्यामुळे त्यांना बँकांनी व सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. पावणेतीन लाख शेतकऱ्यांची कर्जाची मागणी असताना केवळ 27 हजार शेतकऱ्यांना  कर्ज मिळाले असून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत, अशी टीका केली.

Pages