युटोपियन शुगर्स ची हार्वेस्टिंग क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी - Pantnagari Times

Breaking News

Thursday, December 19, 2019

युटोपियन शुगर्स ची हार्वेस्टिंग क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरीमंगळवेढा / प्रतिनिधी

             सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाची कमतरता निर्माण झाल्याने साखर कारखान्यांना विविध आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक साखर कारखाने असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात केवळ ५ ते ६ कारखाने पूर्ण क्षमतेने चालत आहेत तर काही कारखाने कमी क्षमतेने व उर्वरित साखर कारखाने बंद स्थितीत आहेत.

      ऊसाच्या कमतरते बरोबरच जिल्ह्यात ऊस तोडणी यंत्रणेची कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नेहमीच नाविण्याचा शोध घेत अनोखी यंत्रणा उभारणी मध्ये अग्रेसर असणार्‍या  युटोपियन शुगर्स या कारखान्याने मात्र या वरती पर्याय शोधून काढला असल्याची माहिती कारखान्याचे अभ्यासू व कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली .

     नविन तंत्रज्ञाना विषयी माहिती देताना पाटील म्हणाले की, ऊसतोड कामगारांची कमतरता सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच ज्या कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे असे कारखाने हार्वेस्टिंग मशीन चा वापर करीत आहेत. मात्र हार्वेस्टिंग मशीन वापरणे व हार्वेस्टिंग मशीन च्या सहाय्याने तोडणी केलेला ऊस गव्हाणी मध्ये खाली करणे यासाठी टेपलरचा वापर करतात. या साठी आनुषंगिक खर्च ५० लाख रुपया पर्यन्त येतो. व एक वाहन खाली करण्यासाठी साधारणपणे अर्धा तास ईतका कालावधी लागतो.तसेच मेंटेनन्स खर्च ही जास्तीचा येतो. यावर पर्याय काढण्यासाठी युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,  ॲग्रोटेक सेल्स चे श्री अनिल पाटील हे सर्वजण अभ्यास करीत होते. व या सर्वांच्या अभ्यासातून नायलॉन जाळीचा वापर करून ऊस खाली करण्यास सुरुवात केली.या करिता येणारा खर्च ही खूप नगण्य आहे.व कारखान्याला त्यांच्याकडे असणार्‍या प्रचलित यंत्रणेमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही.तसेच इतर वाहनांप्रमाणेच वेळेत वाहन खाली होत आहे.कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा कारखान्यावर न पडता हा पर्याय निघाला आहे. यासाठी ट्रॅक्टर ,डंपिंग ची ही आवश्यकता नाही. तसेच नायलॉन जाळी बाबत ५ ते १० वर्षाची खात्री मिळाली आहे. या नाविण्यपूर्ण संकल्पनेमुळे कमीत कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे वाहन मालकांचा ही वेळ वाचत असल्यामुळे त्यांनीही या बाबत समाधान व्यक्त केले आहे.

      अशा प्रकारचा प्रयोग करणारा युटोपियन शुगर्स हा जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना असून या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी परिसरातील इतर कारखान्याचे अधिकारी भेट घेत असल्याची माहिती कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली.

Pages