मंगळवेढा / प्रतिनिधी
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजाचे प्रतिबिंब त्याच्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मात्र या लेखणीचा वापर करतांना या क्षेत्रातील मर्यादेचे भान पत्रकारांना राहिले तर समाजासाठी ते उपयोगी ठरेल. डिजीटल युगात निर्भीडरित्या पञकारिता करून दामाजी न्यूज आपले वर्चस्व प्रस्थापित करेल असे प्रतिपादन मराठी चित्रपट अभिनेते जयवंत वाडकर यांनी केले.
दामाजी न्यूज व्दितीय वर्धापन दिनानिमित्त श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी अॅड.भारत पवार होते.
तर व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती बबनराव आवताडे,समाजभूषण शिवाजीराव पवार,सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक चंद्रशेखर पाटील,माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार,मसाप शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी,सामाजिक कार्यकर्ते केतन कसबे,दामाजी न्यूजचे एडिटर दिगंबर भगरे, ब्युरो चिफ राजेंदकुमार जाधव आदि उपस्थित होते.
यावेळी वाडकर म्हणाले,दामाजी न्युजने परिसरातील अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांची टीम यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत.दोन पेपर एक न्युज चॅनेल चालवून ते सातत्याने सुरू ठेवण्याची पाहून मनाला खरोखरच आनंद झाला.अकरा लाखाच्या वरती लोकांनी पाहिलेले व सुमारे 8 हजार लोकांनी सबस्क्राईब केलेले मंगळवेढ्यातील हे पहिले न्युज चॅनल आहे. मंगळवेढा सारख्या भागात न्यूज चॅनेल चालवणे म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही. तरीही ती किमया साधली आहे. चॅनल चालवताना जी आकडेवारी अपेक्षित आहे तीही दामाजी न्यूजने लीलया पार पाडली आहे. बातम्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना राबवून त्यांनी अनेक लोकांना मोठे केले आहे.आपल्या लोकांचे कौतुक करण्यासाठी या टीमचे मोठे योगदान आहे.दामाजी न्यूजने आता फक्त बातम्यांपर्यंतच मर्यादित न राहता चौफेर प्रगती करावी.आज ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप हुशार आहेत. अगदी छोट्या छोट्या मुलांच्या बुद्धीचे कौशल्य हुशार माणसांचीही मती थक्क करणारे आहे. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मंगळवेढा परीसरामध्ये मुलांनी शिकून चांगल्या पदावरती मजल मारली पाहिजे दामाजी न्युजच्या माध्यमातून आशा मुलांसाठी मार्गदर्शन केले पाहिजे.
आपल्या लोकांसाठी काम करणारे कमी आहेत पण आपल्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा ही टीम सतत प्रयत्न करत आहेत. दामाजी न्यूजने समाजातील विविध स्तरातील गुणवंतांना पुरस्कार देऊन पुरस्कृत करून त्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला आहे. आपल्याच माणसाचे आपणच कौतुक केल्याने त्या माणसांना खूप आनंद मिळतो.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड.भारत पवार यांनी,लोकमान्य टिळक,डॉ.बाबासाहेब आबेंडकर,जांभेकर यांनीही आपल्या लेखणीतून समाज घडविण्याचे कार्य केले आहे.त्यांच्या काळातील पत्रकारीता आणि आजच्या पत्रकारीतेतच नव्हे तर परिस्थितीतही बदल झालेला आहे.अशा परिस्थितीतही मंगळवेढ्यासारख्या शहरात दामाजी न्यूज ने डिजिटल युगात एक चांगला ठसा आपल्या लेखणी ते न्यूज चॅनेल या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच,विविधांगी विकासात्मक कार्यातही उत्तम असा ठसा उमटविल्याचे सांगीतले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला.सदरप्रसंगी दामाजी न्यूजचे सर्व प्रतिनिधी व लघुचित्रपटाचे दिग्दर्शक,कलावंत यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात मंगळवेढा टाईम्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अॅड.भारत पवार,चंद्रशेखर पाटील,प्रकाश जडे,फिरोज मुलाणी आदिनींही आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय सूचना अशोक उन्हाळे यांनी मांडली त्यास महेश वठारे यांनी अनुमोदन दिले.प्रास्तविक राजेंदकुमार जाधव,सूत्रसंचालन सुलेमान तांबोळी यांनी केले तर भारत दत्तू यांनी आभार मानले.
---
फोटो ओळी-दामाजी न्यूजच्या व्दितीय वर्धापनानिमित्त बोलताना सिनेअभिनेते जयवंत वाडकर व समोर उपस्थित जनसुमदाय (छायाः लखन कोंडूभैरी,मंगळवेढा)