हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीने दिला मंगळवेढ्यातील सामाजिक एकोप्याचा संदेश - Pantnagari Times

Breaking News

Sunday, November 10, 2019

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीने दिला मंगळवेढ्यातील सामाजिक एकोप्याचा संदेश


मंगळवेढा / प्रतिनिधी

-------------------------------


            हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती तथा ईद ए मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांनी काढलेल्या जुलूस मध्ये मंगळवेढयातील सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे हिंदू व दलित समाजाकडून मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. 

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त  मंगळवेढ्यातील मुस्लिम बांधवां कडून आकर्षक रोषणाई व सजावट करून जुलूस काढला जातो.ईद ए मिलादुन्नबी  या नावाने हा जुलूस साजरा केला जातो. मंगळवेढा शहरातील मुलाणी गल्ली येथे जुलूसची आकर्षक स्वागत द्वार तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या आकर्षक स्वागत द्वाराचे वैशिष्ट्ये असे की स्वागत द्वारवर भगवा,हिरवा, निळा व पिवळा झेंडा उभारले होते. सायंकाळी निघालेल्या जुलूस मध्ये मंद वा-याने भगवे,हिरवे, निळे व पिवळे झेंडे अतिशय डोलाने फडफडत असताना दिसत होते.


अयोध्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिल्याने देशातील सामाजिक वातावरण काहीसे ढवळून निघाले असताना हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीने मंगळवेढ्यातील हिंदू, मुस्लिम व दलित यांच्या सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे.मुस्लिम बांधवांच्या सामाजिक एकोप्याच्या संदेशाने हिंदू व दलित समाजाच्या चेह-यावर प्रसन्नता उमटल्याचे दिसून आले.

हिंदू,मुस्लिम व दलित यांच्या या सामाजिक एकोप्याचा संदेश जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी मार्गदर्शनाखाली मुल्ला मोहल्ला ईद मिलाद जुलूस कमिटीचे अक्रम मुलाणी,शाहीद मुलाणी,आदील मुलाणी,मुनीर मुलाणी,सोहेल मुलाणी,रमिजराजा मुलाणी,परवेझ मुलाणी,निहाल मुजावर आदींनी दिला आहे.

ईद ए मिलादुनबीच्या जुलूस मध्ये आकर्षक रोषणाई,सजावट करण्यात आली होती.इस्लामी कव्वाली,नातेपाक व इस्लामी झेंडे जुलूसचे आकर्षण होते.युवकांनी इस्लामी नातेपाक व कव्वालीवर झुमण्याचा मोह व ताल धरला होता.नारे ए तकबीर,अल्लाहू अकबर ! रसूल का दामन नही छोडेंगे,गौस का दामन नही छोडेगे अशा जयघोषाने जुलूस दुमदुमला होता.

मुस्लिम जमियतचे माजी चेअरमन कै.अहमदभाई मुलाणी यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जुलूस प्रारंभ केला होता.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी पासून जुलूसची परंपरा ही मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक एकोपा जपणारी आहे.

एकंदरीत मंगळवेढ्याची हजरत मोहम्मद पैगंबर यांची ही जयंती केवळ हिरव्या रंगात अडकून न राहता भगव्या,निळ्या व पिवळ्या रंगाच्या सामाजिक एकोप्याच्या पावित्र्यात न्हाऊन निघाली असून राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारी आहे.

Pages