भिमा व माण नदीला कॅनॉलचा दर्जा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : प्रा. काळुंगे - Pantnagari Times

Breaking News

Sunday, October 13, 2019

भिमा व माण नदीला कॅनॉलचा दर्जा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : प्रा. काळुंगेमंगळवेढा / प्रतिनिधी

----------------------------


पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या भिमा व माण नदयांना कॅनॉलचा दर्जा  मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील रांझणी, मुंढेवाडी, गोपाळपूर, अनवली, एकलासपूर,शिरगांव, कासेगांव आदी गावभेटीचा दौरा  शुक्रवार दि.11 ऑक्टोबर रोजी करण्यात आला.याप्रसंगी प्रा.काळुंगे बोलत होते.

प्रा.काळुंगे म्हणाले,जनता ही आपल्यासाठी सार्वभौमत्व असून आपण आजवर त्यांच्यासाठी काम करत आलो आहे आणि यापुढेही त्यांच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहीन.पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याला वरदनीय असणारी भिमा नदी व माण नदी या दोन्ही नदयाला कॅनॉलचा दर्जा देण्यासाठी आपले जीवाचे रान करू त्यासाठी आपल्याला सत्ता असणे आवश्यक आहे. यासाठी आपण ही निवडणूक लढवित आहे.सध्या मंगळवेढा तालुक्यात कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असणार्‍या दक्षिण भागातील अनेक गावे आजही सिंचनापासून वंचित आहेत.त्यांना सिंचनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने गेली 27 वर्षे पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.1993 पासून  क्रांतीवीर नागनाथआण्णा नाईकवाडी,आ.भाई गणपतराव देशमुख, स्व.आर.आर.पाटील,डॉ.भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली 13 दुष्काळी तालुक्यांची पाणी संघर्ष चळवळ उभी राहिली.त्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी मंगळवेढयात एक लाख शेतकरी गोळा करून रौप्य महोत्सवी पाणी परिषद घेतली. या परिषदेची दखल घेवून शासनाने हुन्नूरच्या ओढयात म्हैसाळचे पाणी ट्रायल स्वरूपात सोडले.ते पाणी नियमितपणे यावे यासाठी पुन्हा एकदा हुन्नूर येथे 10 हजार शेतकरी गोळा करून विभागीय पाणी परिषद घेतली आणि या पाणी परिषदेच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्याच्या 35 गावच्या उपसा सिंचन योजना,त्याचबरोबर भिमा व माण नदीला कॅनॉलचा दर्जा दयावा,भिमा नदीवर बॅरेजेस बांधावेत अशा प्रकारचे ठराव करून ते ठराव विधीमंडळात पाठविले गेले.शेतकर्‍यांच्या जीवनात हरितक्रांती घडविण्याचे काम गेल्या 27 वर्षापासून मी या पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी व आ.भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केले आहे.

पंढरपूर व मंगळवेढा तालुका स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत काँग्रेसच्या विचाराचा राहिला आहे.आपण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आजवर धनश्री परिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आलो आहे.गोरगरीब जळीतग्रस्त,अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हातभार दिला आहे. या मतदार संघात काँग्रेसची ताकद चांगली असून मी आजवर काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी केलेले प्रामाणिक काम व बाळगलेली निष्टा या जोरावर आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली आहे. परंतू काही विरोधकांनी याबाबत वेगळयाच अफवा पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्यांना आजवर  त्यांनी लोकांमधून अफवा पसरवून आपली राजकिय पोळी भाजून घेतली आहे. खर्‍या अर्थाने आता जनता त्यांची जागा दाखवेल आणि आपल्याला निवडून देवून सर्वसाधारण मतदार संघात विकासप्रिय नेतृत्व करण्याची संधी निश्चितपणे संधी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी विविध गावातील संस्थेचे पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,सरपंच उपसरपंच,कार्यकर्ते  व मतदार  मोठया संख्येने उपस्थित होते.

Pages