मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
''सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणामध्ये आवताडे गट-तटाचे व जाती पातीचे राजकारण न करता विकासाच्या राजकारण केल्यामुळे रखडलेल्या प्रश्नासाठी समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवा," असे आवाहन सभापती प्रदीप खांडेकर यांनी येथे केले.
विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने फटेवाडी, खोमनाळ, तळसंगी, भाळवणी, निंबोनी, पौट, सलगर खु, शिवनगी, येळगी, आसबेवाडी, हुलजंती आदी गावांच्या दौर्यात ते भाळवणीत बोलत होते. यावेळी उमेदवार समाधान आवताडे, येताळा भगत, दत्तात्रय जमदाडे, अनिल बोदाडे, मधुकर शिंदे, महादेव साखरे, धनाजी पाटील, अशोक माने, उमेश शिंदे, बलभीम शिंदे, राजेंद्र साखरे, संतोष यादव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती खांडेकर म्हणाले, ''स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जातीचा विचार न करता विकासासाठी आपल्याला कामाची कुवत बघून सभापती पदाची संधी दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गटातटाचे राजकारण न करता सर्वांसाठी आपले कार्यालय खुले होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळविण्यात यशस्वी ठरलो असून घरकुल, शौचालय,ऑनलाईन कामकाज,रमाई घरकुल,विशेष घटक योजना,वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळवून दिला. या योजनेमुळे जिल्ह्यामध्ये मंगळवेढ्याचे नाव अग्रक्रमाने झाले.''