सरकारने तरूणाईची फसवणूक करत 5 वर्षात राज्य उद्ध्वस्त करून टाकले-धनंजय मुंडे - Pantnagari Times

Breaking News

Monday, October 14, 2019

सरकारने तरूणाईची फसवणूक करत 5 वर्षात राज्य उद्ध्वस्त करून टाकले-धनंजय मुंडेमंगळवेढा / प्रतिनिधी

------------------------------

            कासेगांव ता. पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार भारत तुकाराम भालके यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने तरूणाईसह अबालवृध्द उपस्थित होते. एकच बाणा भारतनाना यंदा हॅट्रीक होणारच असा नारा सभेमध्ये घूमत असल्यामुळे सर्व वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते. यावेळी उमेदवार भारत भालके, तसेच काँग्रेस, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

महाराष्ट्राने असे लबाड सरकार यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. कारण राज्यात कुठेही विहिरी, शेततळे, वृक्षलागवड दिसत नाही. फसवी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा, शिवरायांचा अपमान करणारे देवेंद्र फसवणीस यांचे महायुतीचे सरकार हे नवसाने आलेले सरकार आहे. हे सरकार खाली खेचा असे आवाहन विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले.

यावेळी पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, पवारांचे राजकारण संपले असे फडणवीस म्हणत आहेत. मात्र राज्यात पवारांच्या सभांना तुफान गर्दी होत आहे आणि प्रत्येक सभेत 80% तरूणाई उपस्थित राहत आहे. त्यामुळे हादरलेल्या दिल्लीने ईडीची पूडी आणली. परंतु, पवारांनी ईडीचे तोंड बंद केले. 5 वर्षापूर्वी ज्यांचे राजकारण सुरू झाले ते साहेबांबद्दल बोलत आहेत. परंतु यांना साहेब समजायला 10 जन्म घ्यावे लागतील, असे सांगून मुंडे पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटलांमध्ये हिंमत असती तर त्यांनी ज्या ठिकाणी भाजप कधीच निवडून येत नाही, त्या ठिकाणी उभे राहण्याची हिंमत दाखवली असती. पुणे पदवीधर मधून पून्हा उभा राहण्याची हिंमत नसल्यामुळे पाटील कोथरूडमध्ये गेले आहेत. कुणीही पवारांचा नाद करू नये, मेगा भरतीच्या नावाखाली सरकारने तरूणाईची फसवणूक करत 5 वर्षात राज्य उद्ध्वस्त करून टाकले. आमचे सरकार सत्तेत आल्यास पहिल्या 3 महिन्यात आम्ही 1 लाख सरकारी पदे भरणार आहोत. सैनिकांचा अपमान करणार्‍यांना मी सभागृहात पाय ठेवू दिले नव्हते, असे धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी सांगितले.

Pages